Nashik Fraud News | शहरातील संगणक विक्रेत्यांना ४८ लाखांचा गंडा

18 दुकानदारांची केली फसवणूक
Nashik Fraud News
शहरातील संगणक विक्रेत्यांना ४८ लाखांचा गंडाFile Photo

नाशिक : शहरात संगणक व इतर साहित्य विक्री करणाऱ्या 18 दुकानदारांना संशयिताने ४८ लाख ३३ हजार रुपयांचा गंडा घातला. दुकानदारांकडून माल खरेदी करताना दिलेले धनादेश न वटल्यामुळे फसवणूक झाल्याचे विक्रेत्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहे.

मंदार पाटील असे संशयिताचे नाव असून, त्याने दिलेल्या आधार कार्ड व इतर कागदपत्र बनावट असल्याचे तपासात उघड झाले आहे. संशयित मंदार पाटील हा खासगी एक्झिक्युटिव्ह (प्रतिनिधी) असून, ताे कॅनडा काॅर्नरजवळील आयमॅक्स टेक्नाॅलाॅजी या कॉम्प्युटर सेंटरमार्फत साहित्याचा पुरवठा करत हाेता. गेल्या दाेन-तीन वर्षांत या व्यावसायिक व विक्रेत्यांशी तो संपर्कात हाेता. त्याने जयेश संजय पेंढारकर (रा. तिडकेनगर, नाशिक) यांच्यासमवेत ओळख वाढवून दि. १७ ते २२ डिसेंबर २०२३ या कालावधीत त्यांच्या कॉम्प्युटर विक्री दुकानातून हार्डडिस्क, एलईडी, ईनव्हर्टर, यूएसबी केबल, माउस, की बाेर्ड, अन्य यंत्रसामग्री खरेदी केली होती. दुकानदारांचा विश्वास बसावा, यासाठी राेख स्वरूपात व्यवहार केले. त्यामुळे पेंढारकर यांचा विश्वास बसल्याने त्यांनी तब्बल १७ लाख ५४ हजारांचा माल मंदारला दिला होता. दरम्यान, मंदारने त्यांना'पाेस्ट डेटेड' चेक दिले होते. त्यांनी ते वटविण्यासाठी बँकेत टाकले असता, ते 'बाउन्स' झाले. त्यामुळे पेंढारकरांना धक्का बसला. त्यांनी ओळखीतील दुकानदारांशी संपर्क साधला असता, पेंढारकरसह इतर १७ व्यावसायिकांकडूनही सुमारे ३१ लाख रुपयांचा माल खरेदी करत पैसे दिले नसल्याचे समाेर आले. तसेच त्यांनाही पाेस्ट डेटेड चेक दिल्याचे समाेर आले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येतात व्यावसायिकांनी मंदारशी संपर्क साधला. मात्र, त्याने व्यवसायात ताेटा झाल्याचे व पार्टनरचा अपघाती मृत्यू झाल्याचे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर फसवणूक झालेल्या व्यावसायिकांनी सरकारवाडा पाेलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार मंदारवर फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर मंदार फरार झाला

मंदारने दुकानदारांना दिलेले चेक वटत नसल्याने व्यावसायिकांनी त्याच्याशी संपर्क साधला. 'माझ्या पार्टनरचा अपघाती मृत्यू झाला असून, मला जे चेक मिळाले आहेत, ते बाउन्स झाले आहेत, ते पैसे घेण्यासाठी सूरतला आल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर मंदार हा फरार झाला व त्याने कोणाशीही संपर्क साधला नाही.

मंदारच्या दुकानाला टाळे

मंदारच्या कॅनडा काॅर्नरवरील दुकानास टाळे असून तक्रारदार व इतर व्यावसायिक त्याचा शाेध घेत त्याच्या घरी गेले. तेथेही ताे सापडला नाही. तर, त्याच्या आधारकार्डवरील पत्त्यावर शोध घेतला असता, तो तेथेही राहात नव्हता असे समाेर आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news