

नाशिक : सायबर चोरट्यांनी पार्टटाइम जॉबची ऑफर देत सातपूर परिसरातील युवा अभियंत्याला तब्बल ११ लाख ८५ हजार रुपयांचा गंडा घातला. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे शहरात सायबर फसवणुकीने पुन्हा एकदा डाेके वर काढल्याचे पाहायला मिळत आहे.
सातपूर काॅलनीतील आनंद छाया बसस्टाॅपजवळ राहात असलेल्या आदित्य भावसार (२७) या युवकाला ६ ते ११ सप्टेंबर या कालावधीत संशयित सायबर चाेरट्यांनी मोबाइलवर संपर्क साधत पार्टटाइम जाॅबची ऑफर दिली होती. त्यांनी जाॅबचे फायदे व त्यातून मिळणाऱ्या अधिकच्या आर्थिक परताव्याचीही माहिती दिली होती. कमी वेळेत अधिक नफा मिळणार असल्याने या युवकाने स्कीममध्ये सहभागी होण्यास सहमती दर्शविली होती.
सायबर चाेरट्यांनी आदित्यला विविध साेशल मीडियावर जॉइन करून पार्टटाइमच्या जाहिराती पाठविल्या होत्या. यावेळी आदित्यने संशयितांच्या सांगण्यानुसार प्राेसेस फाॅलाे केली असता, त्याला एका स्टेपचे फ्री टास्क दिले. त्यानंतर गुंतवलेल्या पैशांच्या परताव्यासाठी त्याने 'रिक्वेस्ट' केली असता, चाेरट्यांनी त्याला परताव्यासाठी अधिक पैसे भरावे लागतील असे सांगितले होते. त्यावर युवकाने पैसे परत मिळविण्यासाठी नव्याने रक्कम भरली. पण, त्याला काेणतेही पैसे परत मिळाले नसल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्याचे लक्षात आले. त्यानुसार फसवणूक झालेल्या युवकाने काही दिवसांनंतर सायबर पाेलिस ठाणे गाठून फिर्याद दिली.