

नाशिक : आधार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी मदतीच्या बहाण्याने एका भामट्याने ई सेवा केंद्र चालकाच्या 'करंट अकांऊट'मधून तब्बल तीन कोटी ४१ लाख २६ हजार ५७६ रुपये काढून तसेच ८७ लाख ८९ हजार ४१५ रुपयांचे ओव्हरड्राफ्ट करून गंडा घातला. केंद्र चालकास सात लाख रुपयांची गरज होती. त्यामुळे भामट्याने मदतीच्या बहाण्याने सुमारे सव्वा चार कोटींचा गंडा घातला आहे.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील स्वप्निल बनसोडे (३४) यांचे ई सेवा केंद्र आहे. त्यांना आधार सेवा केंद्र सुरू करायचे होते. त्यासाठी ओळखीच्या माध्यमातून त्यांची संशयित अनिल पवार याच्यासोबत संपर्क झाला. नांदुरनाका येथील हॉटेल प्रेस्टीज येथे २ जुलैला भेटले. स्वप्निल यांना आधार केंद्र सुरू करण्यासाठी पैशांची गरज असल्याचे लक्षात आल्याने संशयित अनिल याने सात लाख रुपयांची मदत करण्याचे आमिष दाखवले. मात्र त्यासाठी स्वप्निल यांच्या बँक खात्यातील करंट अकांऊटचा ताबा अनिल याने मागितला. त्यानुसार स्वप्निलने बँक खात्याची माहिती व पासवर्ड आणि बँक खात्यात लिंक असलेले सीमकार्ड संशयितास दिला. त्यानंतर २ ते ३ जुलै दरम्यान, संशयिताने बँक खात्यातून पैसे काढून दुरुपयोग केला. तसेच ओव्हर ड्राफ्ट मार्फतही पैसे वापरून स्वप्निल यांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी आडगाव पाेलिस तपास करीत आहेत.