

सटाणा : तालुक्यातील ताहाराबाद वनपरिक्षेत्रांतर्गत कंत्राटी पद्धतीने वनमजूर म्हणून काम करणाऱ्या राजेंद्र साळुंखे या कर्मचाऱ्याने रविवारी (दि.२६) प्रजासत्ताक दिनी वनविभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यात तो ६०% भाजला असून अधिक उपचारार्थ नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.
साळुंखे हे गेल्या ३२ वर्षांपासून वनविभागात कंत्राटी पद्धतीने वनमजूर म्हणून काम करतात. अधिकाऱ्यांकडून आपल्यावर अन्याय होत असल्याचे त्यांनी वेळोवेळी निवेदनाद्वारे वरिष्ठांना कळविले आहे. याबाबत त्यांनी यापूर्वी आंदोलनात्मक पवित्रा देखील घेतला होता. गेल्या आठ महिन्यापासून त्यांची बदली परशुरामनगर पोस्ट येथे करण्यात आली होती. गेल्या आठ महिन्यापासून त्यांना मानधन मिळालेले नव्हते. त्यामुळे हे मानधन मिळावे व आपल्याला न्याय मिळावा अन्यथा आपण प्रजासत्ताक दिनी कार्यालयासमोर आत्मदहन करू, असा इशारा साळुंखे यांनी दिला होता.
याबाबत वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस विभागासही त्यांनी निवेदनाद्वारे माहिती दिली होती. परंतु तरीही याकडे गांभीर्याने न पाहिल्याने रविवारी (दि.२६) सकाळी साळुंखे यांनी हातात पेट्रोलची बाटली आणून कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पेट्रोल अंगावर ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यात ते ६०% भाजले. या घटनेनंतर त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. नंतर तेथून पुढील उपचारार्थ त्यांना एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे. संबंधित कर्मचाऱ्याचे वेतन त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले होते आणि पत्राद्वारे त्यांना तसे कळविण्यात आले होते, अशी माहिती याबाबत बोलताना वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर शरमाळे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.