नाशिक
गाळे प्रकल्पात उभारण्यात आलेले विजेचे ट्रान्सफाॅर्मर मोडकळीस आले आहेत.Pudhari News Network

Nashik | तीन दशकांपासून ‘ना रस्ते, ना ड्रेनेज’ नुसताच बकालपणा

असुविधांचा गाळे प्रकल्प : सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्र. २८ वरील गाळे प्रकल्पाची स्थिती
Published on

नाशिक : सतीश डोंगरे

सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नं. २८ वर एमआयडीसीने उभारलेल्या गाळे प्रकल्पाची स्थिती बघितल्यास, 'उद्योग वाढावा, जगावा' हे शासनाचे धोरण नुसतेच बोलण्यापुरते आहे की काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. तब्बल तीन दशकांपासून या ठिकाणी रस्तेच केलेले नसल्याने फूटभर खड्ड्यांमधून उद्योजकांना दररोज वाट शोधावी लागते. तुंबलेल्या ड्रेनेजमधील पाणी सबंध वसाहतीत वाहात असल्याने दुर्गंधीत उद्योजकांंना कामे करावी लागत आहेत. जागोजागी कचऱ्याचे ढीग असल्याने, संपूर्ण वसाहतीला बकाल स्वरूप आले आहे.

सन १९९५ मध्ये एमआयडीसीने ९ हजार ३६० स्क्वे. मीटर एवढ्या जागेवर उभारलेल्या फ्लॅटेड गाळे प्रकल्पात प्रारंभी चार दुमजली इमारतीत ११२ गाळे बांधण्यात आले होते. इमारतीसमोरील जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून दिली होती. मात्र, एमआयडीसीने या पार्किंग जागेत पुन्हा चारमजली इमारत उभारून त्या ठिकाणी ५६ गाळे बांधले. एमआयडीसीने हा प्रकल्प उभारताना, त्या ठिकाणी कुठल्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. उलट पार्किंग जागेत चारमजली इमारत बांधून त्याचा भार संपूर्ण प्रकल्पावर लादला. याशिवाय १९९५ ते मार्च २०२४ पर्यंत येथील उद्योजकांना इमारत पूर्णत्वाचा दाखलाच दिला नसल्याने त्यांना 'सोसायटी' करता आली नाही. परिणामी, प्रकल्पस्थळी कोणत्याच सुविधा करता आल्या नसल्यामुळे सद्यस्थितीत याठिकाणी बकालपणाचे चित्र आहे. काही उद्योजकांनी पुढाकार घेऊन, वर्गणीच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या. मात्र, त्या दीर्घकाळ टिकू शकल्या नसल्यामुळे संपूर्ण प्रकल्प असुविधांच्या गर्तेत आहे.

एकीकडे लघु व सुक्ष्म उद्योगांना भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हटले जाते. दुसरीकडे याच उद्योगांना असुविधांच्या गर्तेत ढकलले जात असल्यामुळे, उद्योग कसा जगणार अन् टिकणार असा प्रश्न येथील उद्योजकांकडून उपस्थित केला जात आहे.

पाच हजार रोजगार, कोट्यवधींचा निधी

या फ्लॅटेड गाळे प्रकल्पातून तब्बल पाच हजार रोजगार निर्माण झाला आहे. याशिवाय शासनाच्या तिजोरीत दरवर्षी १८ कोटींहून अधिक कररूपी निधी जमा होत आहे. सुविधांसाठी एमआयडीसीकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही त्याची अद्यापपर्यंत कुठलीच दखल घेतली गेलेली नाही.

प्लॉट नं. २८ मध्ये वर्षानुवर्षांपासून असुविधा आहेत. एमआयडीसी प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केला. अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या मात्र अद्यापपर्यंत कोणतीच सुविधा उपलब्ध करून दिली नाही. दररोज दुर्गंधी, अस्वच्छतेत कामे करावी लागतात मात्र एमआयडीसी प्रशासन ढिम्म आहे.

नितीन आव्हाड, लघु उद्योजक, नाशिक.

वसाहतीत रस्ते नाहीत. ड्रेनेज तुंबल्याने त्याचे दुर्गंधीयुक्त पाणी संपूर्ण वसाहतीत वाहात असते. त्यामुळे ग्राहक येत नाहीत. आल्यास बाहेरूनच परततात. एमआयडीसीने इमारत पूर्णत्वाचा दाखला व अन्य कागदपत्रे दिली नसल्यामुळे कर्ज घेता आले नाही. प्रचंड असुविधांत आम्ही उद्योग चालवत आहोत.

भरत पाटील, लघु उद्योजक, नाशिक.

गाळे प्रकल्पात उभारण्यात आलेले विजेचे ट्रान्सफाॅर्मर मोडकळीस आले असून, अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. घंटागाडी येत नसल्याने, जागोजागी कचऱ्यांचे ढीग आहेत. संरक्षक भिंत कोसळल्यामुळे चोऱ्या तर नित्याच्याच आहेत. प्रशासनाकडे सांगून काहीही उपयोग होत नाही.

नितीन साळुंखे, लघु उद्योजक, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news