Nashik News | अन्न प्रशासनाच्या रडारवर हॉटेल्स, तपासणी मोहीम धडाक्यात
नाशिक : नाताळ व नववर्षानिमित्त शहरातील हॉटेल्स सजले असले, तरी खबरदारीचा उपाय म्हणून अन्न व औषध प्रशासनाने हॉटेल्स तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या काळात केक व इतर बेकरी उत्पादने खरेदीकडेही नागरिकांचा कल असल्याने, प्रशासनाकडून बेकऱ्यांमधील खाद्य पदार्थांचीही कसून तपासणी केली जात आहे.
या बाबींची पडताळणी
- आस्थापनांनी उलाढालीनुसार परवाना, नोंदणी घेतली आहे की नाही?
- कामगारांचे वैद्यकीय तपासणी अहवाल
- अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरलेल्या पाण्याचे अहवाल
- कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिले आहे का?
- सर्वसाधारण स्वच्छता त्याचप्रमाणे मुदतबाह्य कच्च्या अन्नपदार्थांचा वापर होत आहे का?
- बेकऱ्यांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेले तयार अन्नपदार्थ व तयार करण्यासाठी वापरले जाणारे घटकपदार्थ (उदा. रवा, आटा, मैदा व तूप आदी) यांचे नमुने घेणे
नाताळ व नववर्षानिमित्त पार्ट्यांचे बेत आखले जात असून, या काळात नागरिक विशेषत: तरुण मंडळी फास्ट फूडकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असते. या पार्श्वभूमीवर नाशिक विभागातील सर्व हॉटेल्स, केक विक्रेते व उत्पादक अशा आस्थापनांची तपासणी केली जात आहे. हॉटेल, फास्ट फूड सेंटर, केक उत्पादक यांनी दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी तसेच नागरिकांना अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत काहीही संशय असल्यास अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार करू शकता, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त म. ना. चौधरी यांनी केले आहे. सहायक आयुक्त विवेक पाटील, मनीष सानप, विनोद धवड यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी उ. रा. सूर्यवंशी, यो. रो. देशमुख, एस. डी. तोरणे, सु. जी. मंडलिक, एस. डी. महाजन, गो. वि. कासार, अ. उ. रासकार यांच्या पथकांकडून तपासणी होत आहे.
१३ बेकऱ्यांची तपासणी
मोहिमेत १३ बेकरी आस्थापनांची तपासणी झाली आहे. या अन्न आस्थापनांना अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत नोटिसा पाठविण्यात आल्या असून, त्यांच्याविरुद्ध पुढील आवश्यक कारवाई केली जाणार आहे.

