

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील फूलबाजारात लगबग वाढली असून, पूजेसह घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या सजावटीसाठी फुलांना मोठी मागणी आहे. मागणी वाढल्यामुळे फुलांच्या दरातही वाढ झाली आहे. सध्या २०० ते २५० रुपये जाळी असलेला झेंडू पुढील १० दिवसांत ५०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
गणेशोत्सवात शहरातील फूलबाजारात मोठी मागणी वाढल्यामुळे बाजार फुलला आहे. रविवारी (दि. १३) भरपावसात गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाच्या जय्यत आगमनासाठी व पूजेसाठी घर, मंडप आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी फुलांची मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी केली. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत फुलांच्या दरात वाढ झाली असून, आगामी सणासुदीच्या दिवसात फुलांचे दर आणखी वाढणार आहेत.
झेंडू, गुलाब, शेवंती, मोगरा, गुलछडी यांच्यासह विविध फुलांची आवक बाजारात झाली असली, तरी विशेषतः झेंडूच्या फुलांना गणेशोत्सवात मोठी मागणी असते. हार, तोरण तसेच सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या झेंडूच्या दरात वाढ झाली आहे. मोगरा आणि गुलाबाला ग्राहकांकडून चांगली मागणी आहे.
गणेशोत्सव काळात फुलांची मागणी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सणाच्या दिवसांत मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने ग्रामीण भागातून फुलांची आवक वाढविण्यासाठी व्यापाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर फुलांची आगाऊ मागणी नोंदविली जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे किरकोळ ग्राहकांनाही दरवाढीचा फटका बसत आहे. मात्र, गणेशोत्सवाचा उत्साह कायम असल्याने ग्राहकांकडून वाढीव दरातही फुलांची खरेदी केली जात आहे.
"गणेशोत्सव हा वर्षातून एकदाच येतो. त्यामुळे फुलांचे भाव वाढले असले, तरी गणपतीची सजावट आणि पूजेसाठी फुले खरेदी केली जातात. दरवाढीचा थोडा फटका बसत असला, तरी सणाचा उत्साह कमी झालेला नाही. श्रद्धा आणि परंपरेला महत्त्व देत वाढीव दरातही आवश्यक तेवढी फुले खरेदी करत आहोत."
- अश्विनी पुंड, गृहिणी
"गणपती सजावट, पूजेसाठी लागणारी फुले तसेच हार-तुरे खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. वाढलेल्या दरांनंतरही भक्तांकडून फुलांना मागणी कायम असल्याने विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गणेशोत्सवातील भक्तीभाव आणि उत्साहामुळे फुलांच्या विक्रीला यंदाही चांगला प्रतिसाद मिळत आहे."
- आकाश गिते, फूलविक्रेता