

सातपूर : सातपूर औद्योगिक वसाहतीतील ज्योति स्ट्रक्चर्स लिमिटेड या कंपनीच्या प्लांट ई 60 व 61 मध्ये शुक्रवारी (दि. 20) दुपारी साफसफाई करीत असताना पीयूसी टॅंकला अचानक आग लागल्याची घटना घडली. तब्बल तासभर अग्निशामक दलाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आगीचे कारण गुलदस्त्यात असून, अधिक तपास पोलिस करत आहे.
शुक्रवारी (दि. 20) दुपारी अचानक कंपनीच्या मागे असलेल्या पीयूसी टॅंकला आग लागल्याने धुराचे प्रचंड मोठे लोट आकाशात दिसत होते. तर आजूबाजूच्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनीही आग बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. आग लागण्याचे निश्चित कारण समजू शकले नसून, गेल्या सहा महिन्यांपासून हा प्लांट बंद होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच हा प्लांट चालू करण्यासाठी साफसफाईसह इतर कामकाज चालू असताना अचानक आग लागल्याही माहिती कंपनीचे व्यवस्थापक प्रसन्न काळकर यांनी दिली. मनपा अग्निशमन विभागाच्या पथकाने 5 बंबाने तासाभराच्या प्रयत्नानंतर अखेर या आगीवर नियंत्रण मिळवले.