

नाशिकरोड / मनमाड : भुसावळ विभागात बुधवारी (दि. ११) रेल्वे विभागाने राबविलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत नियमबाह्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वे तपासणी पथकाने तीन लाख ३१ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
भुसावळ, नाशिकरोड, मनमाड, खंडवा, अकोला, बडनेरा आणि जळगाव या सात महत्त्वाच्या स्थानकांत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ५५ तिकीट तपासनीस आणि ६ रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) कर्मचारी सहभागी होते. ५३९ प्रवासी नियमबाह्य पद्धतीने प्रवास करताना आढळले. त्यात विनातिकीट प्रवास करणे, आरक्षित डब्यातून चुकीच्या तिकिटावर प्रवास करणे, जादा सामान स्वत:जवळ बाळगणे आदी प्रकरणी कारवाई करण्यात आली. रेल्वे कायदा कलम १४५(ब) अंतर्गत ११ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असून, यामध्ये २,१०० रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रत्येक तपासनीसाने सरासरी ९.८० प्रकरणे हाताळत सरासरी ६,०३० रुपयांचा दंड वसूल केला. प्रामाणिक प्रवाशांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांचा प्रवास अधिक सुसह्य व्हावा, हे उद्दिष्ट असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.