Nashik Fertilizer Production | कचऱ्यापासून 88,738 मे. टन खत निर्मिती

पुढारी विशेष ! गेल्या 14 वर्षांत नाशिककरांनी केला 25.85 लाख टन कचरा
खतप्रकल्प
खतप्रकल्पPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : आसिफ सय्यद

'स्वच्छ, सुंदर व हरित नाशिक'ची बिरुदावली मिरवणाऱ्या नाशिककरांनी गेल्या १४ वर्षांत तब्बल २५ लाख ८५ हजार ७२५ टन कचरा निर्माण केला असून, या कचऱ्यापासून महापालिकेच्या खतप्रकल्पात तब्बल ८८ हजार ७३८ टन कंपोस्ट खताची निर्मिती करण्यात आली आहे.

Summary

८८ हजार ७३८ टन एवढ्या मोठ्या प्रमाणावर कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करणारी नाशिक महापालिका राज्यातच नव्हे तर देशात आघाडीवर आहे. केवळ कंपोस्ट खत नव्हे तर ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती, प्लास्टिकपासून इंधन आॉइल, सुक्या कचऱ्यापासून इंधन विटा, आदी उत्पादने देखील तयार केली जात आहेत.

महापालिकेच्या माध्यमातून २००१ मध्ये पाथर्डी शिवारात कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्पाची उभारणी केली गेली. गेल्या २५ वर्षांपासून आजपर्यंत अपवाद वगळता कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती सुरू आहे. सद्यस्थितीत घंटागाड्यांद्वारे दररोज सुमारे ७५० टन कचरा शहरातून गोळा करून खतप्रकल्पावर आणला जातो. २०१७ पासून खतप्रकल्प नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. या कंपनीला तीस वर्षे मुदतीकरीता चालविण्यास दिला आहे. या प्रकल्पाची क्षमता ८०० टन प्रतिदिन पर्यंत वाढविण्यात आली आहे. महापालिकेकडे २०११-१२ पासून उपलब्ध आकडेवारीनुसार गेल्या १४ वर्षांत घंटागाड्यांद्वारे तब्बल २५ लाख ८५ हजार ७२५ टन कचरा खतप्रकल्पावर वाहून नेण्यात आला आहे. या ठिकाणी या कचऱ्यापासून ८८ हजार ७३८ टन कंपोस्ट खताची निर्मिती करण्यात आली आहे.

चौदा वर्षांत अडीचपट वाढला कचरा

वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात कचऱ्यातही वाढ झाली आहे. गेल्या चौदा वर्षात शहरातील कचरा अडीच पटीने वाढला आहे. २०११-१२ या आर्थिक वर्षात नाशिक शहरातून १ लाख २१ हजार २५६ टन कचरा खतप्रकल्पावर वाहून नेण्यात आला होता. २०२३-२४ या वर्षात तब्बल २ ला‌ख ७८ हजार ३८७ टन कचरा खतप्रकल्पावर वाहून नेण्यात आला आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ या आठ महिन्यांच्या कालावधीतच १ लाख ९३ हजार ५७२ टन कचरा खतप्रकल्पावर टाकण्यात आला आहे.

दररोज 35 टन प्लास्टिक कचरा

घंटागाड्याद्वारे केरकचरा संकलित करून खतप्रकल्पावर आणला जातो. हा कचरा खतप्रकल्पावरील लॅण्डफीलवर टाकला गेल्यानंतर कचऱ्याचे विलगीकरण केले जाते. दररोज संकलित होणाऱ्या सुमारे ७५० टन कचऱ्यात तब्बल ३५ टन प्लास्टीक कचरा तर २० टन घरगुती घातक कचऱ्याचा समावेश आहे. प्लास्टीक कचऱ्यापासून इंधन आॅइल तयार केला जात असून खतप्रकल्पात मृत जनावरांच्या विल्हेवाटीसाठी बसविण्यात आलेल्या दाहिनीसाठी या इंधनाचा वापर केला जात आहे.

कचराकुंडीमुक्त शहर संकल्पनेअंतर्गत शहरात घंटागाडी योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत घरोघरी केरकचरा संकलनाचा विभागनिहाय ठेका देण्यात आला असून दररोज सुमारे ७५० टन कचरा घंटागाड्यांद्वारे संकलित करून खतप्रकल्पावर पुढील प्रक्रियेसाठी वाहून नेला जात आहे.

अजित निकत, उपायुक्त तथा संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग

घंटागाड्यांद्वारे खतप्रकल्पावर वाहून आणल्या जाणाऱ्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जात आहे. त्याचबरोबर, प्लास्टिक पासून इंधन आॉईल, लिचेट ट्रीटमेंट प्लांट, ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती, सुक्या कचऱ्यापासून इंधन विटा आदींची निर्मती केली जात आहे. खतप्रकल्पात तयार होणाऱ्या इंधन आॉईलचा वापर मृत जनावरे शवदाहिनीचा प्रकल्पासाठी केला जात आहे.

बाजीराव माळी, कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news