देवळाली कॅम्प : एमडी ड्रग्जप्रकरणी संपूर्ण राज्यात बदनाम झालेल्या शिंदे गावात फटाक्याच्या गोदामाला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाले असून, एक कर्मचारी भाजल्याने अत्यवस्थ आहे. तर आठ कर्मचाऱ्यांना स्थानिकांनी वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.
शिंदे गावातील नायगाव रस्त्यावर देवळाली गावातील चंद्रकांत विसपुते व मुलगा गौरव यांच्या मालकीचे फटाक्यांचे गोदाम आहे. शिंदेगाव- नायगाव मार्गावरील खासगी औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या या गोदामात तामिळनाडूतील शिवकाशी येथून फटाके घेऊन आलेल्या ट्रक (टीएन २८ बीसी 8042) हा माल गोदामात खाली करून निघण्याच्या तयारीत होता. परंतु अचानक ट्रकने पेट घेतला. ट्रकमधील शिल्लक फटाके पेटल्याने ते फुटण्यास सुरुवात झाली. पेटलेले काही फटाके गोदामात जाऊन पडल्याने तेथील फटाक्यांनी पेट घेतला. त्यानंतर पुढील तीन तास शिंदे परिसर बॉम्बस्फोटांसारखा आवाजाने दणाणून गेला. घटनास्थळी आगीचे बंब पोहोचेपर्यंत आगीने रुद्र रूप धारण केले होते. नाशिक रोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी व पोलिसांनी तातडीने धाव घेत घटनास्थळी जमलेली गर्दी दूर करत बंबांना मार्ग करून दिला आणि आग नियंत्रणात आणली.
गोदामात अडकलेले आठ कामगार व ट्रकसोबतचे दोन असे दहा व्यक्तींना वेळीच बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. आगीमुळे फटाक्याच्या गोडाऊनचे जवळपास अंदाजे 40 ते 50 लाखोंचे नुकसान झाले आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच बंब आणि पंधरा जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून तीन तासांत आग आटोक्यात आणली.
दुपारी एकच्या सुमारास फटाके फुटू लागल्याने अग्निशामक दलाचे बंब हजर होईपर्यंत स्थानिक नागरिकांनी जेसीबी, ट्रॅक्टर यांच्या माध्यमातून आजूबाजूचे लाकडी, पत्र्याचे शेड हलवले. शिवाय अग्निशामक दलाच्या पंपांना स्थानिकांच्या विहिरीवरून तातडीने पाणी भरून मदत केल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगार, सरपंच बाजीराव भागवत, माजी उपसरपंच संजय निवृत्ती तुंगार, किरण मते, प्रमोद सांगळे, सूरज गिते, नीलेश अमृते यांनी मदत केली.
गेल्या कित्येक वर्षांपासून आपला फटाके विक्रीचा व्यवसाय आहे. अशी घटना कधीही घडली नाही. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती ओढवली. सुदैवाने आर्थिक नुकसान वगळता अप्रिय घटना घडली नाही.
चंद्रकांत विसपुते, गोदाम मालक, शिंदे-पळसे, नाशिकरोड.