Nashik news | नाशिकच्या फूल उत्पादकांची मुंबईत जागेअभावी परवड
जानोरी : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जानोरी, मोहाडी, आंबे आणि शिवनाई ही गावे गेल्या दोन दशकांपासून फूलशेतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जातात. मात्र, सध्या मुंबईतील हक्काची बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे आणि महानगरपालिका व पोलिसांच्या कारवाईमुळे या भागातील फूल उत्पादक शेतकरी देशधडीला लागला आहे.
बँकांचे करोडो रुपयांचे कर्ज काढून फुलविलेली शेती बाजारपेठेअभावी कोमेजून जात आहे. जानोरी आणि परिसरातील गावांत जवळपास ४३० एकर क्षेत्रांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने फूलशेती केली जाते. यात १०० एकर पॉलिहाऊसमध्ये जरबेरा, गुलाब, जिप्सो, इस्टोमा आणि शेवंती यांसारखी उच्च दर्जाची फुले उगविली जातात. ३०० एकर खुल्या वावरात आणि ३० एकर शेडनेटमध्ये झेंडू, शेवंतीच्या विविध जाती (भाग्यश्री, सुपर केशरी, टाटा केशरी, जुलिया बायकलर) पिकविली जातात. या उद्योगावर दररोज दोन हजारांहून अधिक मजुरांचे पोट अवलंबून आहे.
फूल उत्पादक संघटित होणे गरजेचे
या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी फूल उत्पादक संघटित होत आंदोलनाच्या तयारीत आहेत. विविध ग्रामपंचायतींचा ठराव घेत कृषीमंत्री, पणनमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे. फूल उत्पादकांनी संघटित होऊन आपल्या हक्कासाठी या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन फूल उत्पादकांनी केले आहे.
मुंबईत फुटपाथवर व्यापार, शेतकऱ्यांचे नुकसान
दिंडोरी तालुक्यासह जिल्ह्यातून दररोज सरासरी पाच ट्रक फुले मुख्यत्वे मुंबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी जातात. मात्र, मुंबईत हक्काचे 'फूल मार्केट' नसल्यामुळे व्यापाऱ्यांना पहाटे ३ ते सकाळी ८ पर्यंत दादरच्या रस्त्यावर व फुटपाथवर बसून व्यापार करावा लागतो. गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांनी रस्त्यावर फुले खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर तसेच फूल उत्पादक शेतकऱ्यांवर कारवाई सुरू केल्यामुळे तात्पुरती असलेली फूल बाजारपेठ विस्कळीत झाली आहे. व्यावसायिकांवर होत असलेल्या कारवाईच्या बडग्यामुळे व्यावसायिकांकडून फुलांची खरेदी केली जात नसल्यामुळे शेतकऱ्यांचा माल फेकून द्यावा लागत आहे.
"बँकांचे कर्ज काढून ही शेती उभी केली. मात्र, मुंबईत फूल मार्केटसाठी स्वतंत्र जागा नसल्यामुळे आमचे नुकसान होत आहे. सरकारने तातडीने यावर तोडगा काढून शेतकरी व व्यापाऱ्यांना पर्यायी व कायमस्वरूपी सुविधांसह जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही."
- गणेश वाघ, फूल उत्पादक, जानोरी

