
सिडको (नाशिक) : अंबड, सातपूर, आडवण, पारदेवी आणि राजूर बहुला येथील शेतकऱ्यांनी एमआयडीसीच्या जबरदस्तीच्या भूसंपादनाला विरोध करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बुधवार (दि.9) रोजी चुंचाळे येथील पांजरापोळ प्रवेशद्वारासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असून मागण्या मान्य न झाल्यास सोमवार (दि.14) रोजी गावातील शेतकऱ्यांतर्फे नाशिक ते मंत्रालय ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येईल, असे प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी सांगितले. या बैठकीनंतर अंबड एमआयडीसी चौकी येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांना निवेदन देण्यात आले.
तसेच सोमवार ( दि ८) रोजी एमआयडिसी ऑफीस व पोलिस आयुक्त यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अंबड गांव येथे अंबड सातपूर आडवंन पारदेवी व राजूर बहुला येथील शेतकऱ्यांची बैठकीत निर्णय घेण्यात आला. या बैठकीत साहेबराव दातीर शांताराम फडोळ, डॉक्टर भाऊसाहेब दातीर, बारकु दातीर, ज्ञानेश्वर कोकणे, नवनाथ कोकणे, राजेंद्र जाधव, शिवाजी काळे, उत्तम दातीर, संतोष ढोकणे, सुभाष जाधव, शांताराम जाधव, किसन चौधरी, सुखदेव चिंधे यांनी मनोगत व्यक्त केले.
आडवंन पारदेवी व राजूर बहुला या शेतकऱ्यांच्या विरोध असतांनाही बळजबरीने भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्याचे काम सुरू आहे. पांजरापोळ या जागेचा पर्याय स्विकारावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यामध्ये पांजरापोळ या जागेचे सर्वेक्षण करून ती जागा प्रशासन ने ताब्यात घ्यावी. अंबड व सातपूर येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या अकराशे हेक्टर इतक्या जमिनीचे प्रशासनाने ऑडिट करावे अन्यथा उपोषण करुन ट्रॅक्टर मोर्चाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.