

विंचुरी दळवी (नाशिक) : सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात पांर्ढुली, शिवडा, बेलू, आगसखिंड, बोरखिंड, घोरवड आदी गावांमध्ये युरियाच्या तुटवड्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या भागात उन्हाळी मका पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली असून, सध्या या पिकाला युरियाची अत्यंत गरज आहे. मात्र, युरिया खत सहज उपलब्ध न होण्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.
काही कृषी सेवा केंद्रांवर युरिया उपलब्ध असला तरी तो अव्वाच्या सव्वा दराने किंवा लिकिंग खतासोबतच विकला जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 270 रुपयांच्या 45 किलोच्या युरिया पिशवीसह जबरदस्तीने लिकिंग खत विकले जाते, ज्यासाठी शेतकऱ्यांकडून तब्बल 2000 रुपये वसूल केले जातात. शेतकरी लिकिंग खत घेण्यास नकार दिल्यास दुकानदार त्यांना अरेरावीची भाषा वापरत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
एकीकडे अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान आणि दुसरीकडे बाजारात शेतीमालाला योग्य भाव नाही, अशात खताच्या टंचाईने शेतकरी तिहेरी संकटात सापडला आहे. कृषी विभागाने ‘लिंकिंगला नाही म्हणा’ असे फलक कृषी केंद्रांवर लावले असले तरी काही विक्रेते कृषी विभागाच्या डोळ्यांना फसवून लिकिंग खत खरेदी करून ते महाग दराने विकत असल्याचे आरोप होत आहेत.
कृषी विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांनी यावर त्वरित कारवाई करावी, तसेच युरिया उत्पादक कंपन्यांना कडक इशारा देऊन लिकिंगची पद्धत थांबवावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. लवकरच युरिया उपलब्ध न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.