

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिकेच्या वतीने १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून हाती घेण्यात आलेल्या सुमारे २०० कोटी रुपयांच्या गंगापूर ते बारा बंगला थेट जलवाहिनीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. १२.५ किलोमीटर लांबीच्या या जलवाहिनीपैकी पहिल्या टप्प्यात ८.५ किमी. जलवाहिनीची चाचणी घेतली जाणार असल्याने येत्या २४ ऑक्टोबरला पाणीपुरवठ्याचा 'शटडाउन' घेण्याचे नियोजन महापालिकेतर्फे करण्यात येत आहे. यामुळे या दिवशी संपूर्ण नाशिक शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
गंगापूर धरण ते बाराबंगला जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान २००३ मध्ये टाकण्यात आलेली सिमेंटची थेट जलवाहिनी वारंवार नादुरुरुस्त होत असल्याने १३व्या वित्त आयोगाच्या निधीतून नवीन लोखंडी थेट जलवाहिनी टाकण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.
'जिंदाल' (जेडब्ल्यूएल) कंपनीकडून हे काम करण्यात येत आहे. महापालिकेने सप्टेंबर २०२५ मध्ये मक्तदाराला ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली होती. तरीही काम पूर्ण न झाल्याने १ मेपासून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली. १ ते १५ मेदरम्यान दररोज एक लाख रुपये, तर १६ मेपासून दररोज अडीच लाख रुपये दंड आकारला जात आहे.
आता संबंधित ठेकेदाराला ३१ ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे अल्टीमेटम देण्यात आले आहे. १२.५ किलोमीटर लांबीच्या या जलवाहिनीपैकी आतापर्यंत १२.३५ किलोमीटर लांबीचे जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. बाराबंगला जलशुद्धीकरण केंद्रालगत जलवाहिनीच्या क्रॉस कनेक्शन तसेच पंचवटीतील ग्रॅव्हिटी मेन लाइनच्या जोडणीचे काम अपूर्ण आहे.
दरम्यान, काम पूर्ण झालेल्या जलवाहिनीच्या भागाची पहिली चाचणी महापालिकेच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. त्यासाठी २४ ऑक्टोबरचा मुहूर्त निश्चित करण्यात येत आहे. या दिवशी गंगापूर धरण ते पाइपलाइन रोडपर्यंत काम पूर्ण झालेल्या ८.५ किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीची चाचणी घेतली जाणार आहे. त्यासाठी नाशिक शहराचा पाणीपुरवठा मात्र बंद ठेवावा लागणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील चाचणी दिवाळीनंतर
जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने चाचणी घेतली जाणार असून, त्यात यश आल्यास शहराला नव्या थेट जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाणार आहे. यामुळे पाणीगळतीचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. तूर्त २५ ऑक्टोबरला पहिली चाचणी घेतल्यानंतर दुसरी चाचणी दिवाळीनंतर घेण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. सणासुदीच्या काळात नाशिककरांना पाणीप्रश्न मेदसावू नये, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे.
"गंगापूर थेट जलवाहिनीचे काम ऑक्टोबरअखेर पूर्ण करण्याच्या सक्त सूचना मक्तदाराला देण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात गंगापूर धरण ते पाइपलाइन रोडपर्यंतच्या जलवाहिनीची चाचणी घेतली जाणार आहे. त्यासाठी २४ ऑक्टोबरला शटडाउन घेण्याचे नियोजन केले जात आहे."
— रवींद्र धारनकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा, महापालिका