

नाशिक : आदिवासी विकास विभागाकडून आयबीपीएस कंपनीच्या माध्यमातून 611 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 2 नोव्हेंबर होती. मात्र, निर्धारित मुदतीनंतरही अनेक उमेदवार अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्याने मंगळवार, दि. 12 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय आदिवासी विकास प्रशासनाने घेतला आहे. परिणामी, राज्यभरातील इच्छूक व पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आदिवासी विकास विभागाने 611 पदांसाठी 5 ऑक्टोबर रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल, मुख्य लिपिक, सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ), आदिवासी विकास निरीक्षक (नॉनपेसा), वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, लघुटंकलेखक, गृहपाल-स्त्री, गृहपाल- पुरुष, अधीक्षक- स्त्री, अधीक्षक- पुरुष, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक आदी पदांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेला उमेदवारांचा चांगला प्रतिसाद लाभत असून, आतापर्यंत सुमारे 95 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत.
दरम्यान, पात्र व इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी https://tribal.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन आदिवासी विकास प्रशासनाने केले आहे.
आदिवासी विकास विभागाने नोव्हेंबर-2023मध्ये 602 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. फेब्रुवारी- 2024 मध्ये राज्य शासनाने मराठा आरक्षण लागू केल्याने ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या सुमारे 84 हजार उमेदवारांना शुल्क परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित उमेदवारांना मंगळवार (दि. 12)पर्यंत शुल्क परताव्यासाठी अर्ज करता येणार