Nashik | माजी आ. गितेंच्या अतिक्रमित कार्यालयावर हातोडा

माजी आमदार गिते यांच्या कार्यालयावर महापालिकेची कारवाई
Municipal Encroachment Removal Squad
नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत जेसीबीद्वारे तोडण्यात येत असलेले माजी आमदार वसंत गिते यांचे मुंबई नाक्यावरील कार्यालय. (छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचे हिशेब चुकते करण्याचे प्रकार आता सुरू झाले असून, शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा माजी आमदार वसंत गिते यांच्या मुंबई नाका येथील अतिक्रमित संपर्क कार्यालयावर महापालिकेने शनिवारी (दि. २९) सायंकाळी हातोडा मारला.

एसटी महामंडळाच्या जागेवर असलेल्या गितेंच्या संपर्क कार्यालयासह लगतची खाद्यपदार्थ विक्रेत्यांची अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात जेसीबीद्वारे हटविण्यात आली. दरम्यान, पालिकेची ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करत या कारवाईविरोधात गिते समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला.

माजी आ. गिते यांच्या संपर्क कार्यालयासह लगतच्या चार ते पाच खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या अतिक्रमणांविरोधात शिंदे गटाच्या युवा सेनेचे विस्तारक योगेश बेलदार यांनी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे तक्रार केली होती. त्यावरून महापालिकेने माजी आ. गिते यांच्यासह खाद्यपदार्थ विक्रेत्यांना दोन वेळा नोटिसा बजावल्या होत्या. ही जागा एसटी महामंडळाच्या मालकीची असल्यामुळे महापालिकेला कारवाईचा अधिकार नसल्याचा दावा करत अतिक्रमणधारकांनी पालिकेच्या या कारवाईला स्थगिती मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. दि. २२ जून रोजी या याचिकेवर सुनावणीही झाली होती. त्यात महापालिकेने बाजू मांडण्यासाठी मुदत मागितल्यानंतर दि. ३ जुलै रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली होती. परंतु कारवाईला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिल्यामुळे आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी हे अतिक्रमण हटविण्याचे आदेश जारी केले होते. या कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या शक्यतेने मुंबई नाका परिसरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तब्बल अडीच तास चाललेल्या नाट्यपूर्ण घडामोडींनंतर सायंकाळी 6.15 च्या सुमारास पालिकेने कारवाईला सुरुवात केली. यावेळी गिते समर्थक व कार्यकर्त्यांनी राज्यातील शिंदे-भाजप सरकार तसेच महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.

Former A. Gite's Liaison Office
नाशिक : कारवाईपूर्वी संपर्क कार्यालयातून बाहेर काढण्यात येत असलेली स्व. बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा.(छाया : हेमंत घोरपडे)

अडीच तासांच्या प्रतीक्षेनंतर कारवाई

दुपारी ४ च्या सुमारास पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक पोलिस फौजफाट्यासह कारवाईस्थळी मुंबई नाका येथे दाखल झाले होते. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रभारी उपायुक्त तथा सहायक आयुक्त मयूर पाटील तसेच पूर्व विभागीय अधिकारी राजाराम जाधव तसेच पंचवटी व पश्चिम विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांनी कारवाईसंदर्भात सूचना दिली. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे पालिकेची कारवाई वैध नसल्याचा दावा वसंत गिते, माजी उपमहापौर प्रथमेश गिते, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला. कारवाईबाबत आयुक्तांचे आदेश नसल्याचाही आक्षेप यावेळी घेण्यात आला. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशासाठी अधिकारी परतले. तब्बल दीड तासानंतर सायंकाळी 6 च्या सुमारास अधिकारी आयुक्तांच्या आदेशांसह परतले. त्यामुळे कारवाईला होणारा विरोध नरमला.

Former A. Gite's Liaison Office
नाशिक : कारवाईदरम्यान मुंबई नाका चौकात झालेली वाहतूक कोंडी.(छायाचित्रे : हेमंत घोरपडे)

प्रचंड तणाव आणि घोषणाबाजी

पालिकेच्या या कारवाईदरम्यान, मुंबई नाका परिसरात गिते समर्थक तसेच शिवसैनिक शेकडोंच्या संख्येने जमा झाल्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पालिकेची ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी सुरुवातीला या कारवाईला विरोध केला. परंतु आदेशाची प्रत दाखविल्यानंतर गिते यांनी कार्यकर्त्यांना कायदा व सुव्यवस्था पाळण्याचे आवाहन केले. गिते यांच्या संपर्क कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे पूजन करून हटविण्यात आले. त्यानंतर जेसीबीद्वारे कार्यालय तोडण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या होत्या. 'वसंत गिते आगे बढो हम तुम्हारे साथ हैं', 'शिवसेनेचा विजय असो', '५० खोके एकदम ओके', 'बडी भाभी मुर्दाबाद' अशा घोषणा यावेळी दिल्या गेल्या.

ठाकरे गटाच्या नेत्याला टार्गेट करून त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आणि जागेची मालकी एसटी महामंडळाची असताना महापालिकेने कोणत्या अधिकाराने ही कारवाई केली, ते समजले नाही. महापालिकेच्या या बेकायदेशीर कारवाईचा आम्ही निषेध करतो.

- सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख, शिवसेना ठाकरे गट.

कारवाईला फरांदे-गिते वादाची किनार

पालिकेच्या या कारवाईमागे नाशिक मध्य मतदारसंघातील भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गिते यांच्यातील राजकीय वादाची किनार असल्याची चर्चा आहे. गत लोकसभा निवडणुकीदरम्यान जुन्या नाशकातील घासबाजार येथील मतदान केंद्रासमोर आ. फरांदे व गिते यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती. शिवराळ भाषेचा वापर आणि एकमेकांना दाखवून देण्याची भाषाही यावेळी झाली होती. या वादातूनच गिते यांचे अतिक्रमित संपर्क कार्यालय तोडण्यात आल्याचे सांगितले जाते. 'बडी भाभी मुर्दाबाद'च्या घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. दरम्यान, आ. फरांदे यांनी या कारवाईत आपला कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

गेल्या ३५ वर्षांपासून या ठिकाणी संपर्क कार्यालय होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील पूर्वी या कार्यालयात येऊन गेले आहेत. ही जागा महापालिकेच्या मालकीची नसताना केवळ राजकीय सूडापोटी ही कारवाई करण्यात आली आहे. मध्य नाशिकच्या आमदार सूडबुद्धीने पेटून उठल्या असून, लोकसभा निवडणुकीतील वादाची पार्श्वभूमी या कारवाईमागे आहे.

- वसंत गिते, माजी आमदार.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news