कळवण : 75 वर्षाचा कालावधी उलटूनही मूलभूत सुविधांपासून गायदर पाडा वंचित असून याकडे मात्र लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.
कळवण तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायत पैकी असलेल्या गायदरपाडा हे गाव मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. गेल्या दीड ते दोन वर्षापूर्वी प्रसार माध्यमांनी झोपलेल्या प्रशासनाला जागे करून त्या ठिकाणी काही प्रमाणात नागरी सुविधा पोहचल्या असल्या तरी आजही येथील नागरिकांना मरणानंतरही मरण यातना भोगाव्या लागत असल्याचे दुर्देवी चित्र पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी पासून मळगाव ते गायदर पाडा या सात किलोमीटर रस्त्याचे काम सुरू झाले आहे. परंतु पावसाळ्याच्या सुरुवातीलाच डोंगराचा काही भाग भुस्खलन होऊन रस्ता वाहनांसाठी बंद झाला. त्यामुळे नागरिकांची दळणवळणाची सुविधाच बंद झाली आहे.
पावसाळ्यात या भागात संततधार पाऊस असल्यामुळे नागरिकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. त्यातच मंगळवार (दि.3) रोजी गायदरपाडा येथील रहिवासी उत्तमा गोटीराम सोनवणे या महिलेचा गुजरात येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तिचा मृतदेह रात्री अकरा वाजता खाजगी वाहनाने गायदरपाडा डोंगराच्या पायथ्याशी पोहचवण्यात आला. मात्र रस्ता बंद झाल्यामुळे व वाहनाने मृतदेह घेऊन जाणे शक्य नसल्याने अक्षरशः कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी बॅटरीच्या उजेडात मृतदेहाची डोली करून आठ किलोमीटरच्या जंगलातून व नदी नाल्यातून पायपीट करत मंगळवार (दि.3) रोजी रात्री एकच्या सुमारास मृतदेह गायदर पाडा येथे पोहोचवला.
करंदबारीत पावसाळ्यात पहिल्याच पावसात दगड व माती रस्त्यावर कोसळून रस्ता बंद झाला. त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण यांना सरपंच सुखदेव बागुल यांनी भ्रमणध्वनीवरून व प्रत्यक्षात भेटून रस्त्याबाबतची माहिती दिली. परंतु विभागाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. त्यानंतर त्यांनी तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी यांना याबाबत सूचित केले असता त्यांनी संबंधित विभागाला रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले. परंतु आजही येथील रस्ता पूर्णपणे बंद अवस्थेतच आहे. कळवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार तरी कधी? आणि गायधर पाडा येथील नागरिकांच्या नरक यातना थांबतील तरी कधी? हा प्रश्न उपस्थित होत आहे. झालेल्या प्रकाराबाबत परिसरातील नागरिकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागावर व प्रशासनावर संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.