

नाशिक : कंपन्यांबाहेर अनधिकृतपणे टपऱ्या उभारून त्या ठिकाणी सर्रास अवैध धंदे चालविले जातात. सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतींत अनेक कंपन्यांबाहेर अशा प्रकारच्या टपऱ्या उभारण्यात आल्या आहेत. दरम्यान, या टपऱ्या उभारल्या जाऊ नयेत तसेच हॉकर्सनी अतिक्रमण करू नये यासाठी उद्योजकांकडून कंपन्यांबाहेरील मोकळ्या जागेत सुशोभीकरण केले जात आहे. सातपूरमध्ये काही कंपन्यांनी अशा प्रकारचे सुशोभीकरण केल्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधले जात आहे.
सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतींतील हाॅकर्स तसेच टपरीधारकांना आवर घालावा यासाठी उद्योजकांकडून वारंवार महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे तक्रारी केल्या जातात. जिल्हा उद्योगमित्रच्या बैठकीतदेखील यावरून उद्योजकांकडून वेळोवेळी आवाज उठविण्यात आला आहे. उद्योजकांच्या तक्रारीनंतर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात कारवाई केली जाते. मात्र, कारवाई संपताच टपऱ्या तसेच हॉकर्स आपली दुकाने थाटत असल्यामुळे कारवाई हा निव्वळ फार्स ठरत आहे. दरम्यान, आता उद्योजकांनीच टपरीधारक आणि हॉकर्सच्या जाचावर रामबाण उपाय शोधला आहे. कंपन्यांबाहेरील मोकळ्या जागेत सुशोभीकरण करण्याचे काम अनेक कंपन्यांनी हाती घेतले आहे. विविध रंगांच्या फुलांची झाडे, लॉन्स, फुटपाथ आदी कामे केली जात असल्याने कंपनीबाहेरील वातावरण प्रसन्न होत आहे.
टपरीधारकांची तक्रार केल्यानंतर अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून तात्पुरती कारवाई केली जाते. मात्र, कारवाई संपताच पुन्हा टपऱ्या उभारल्या जात असल्याने, परिस्थिती जैसे थे राहात आहे. त्यामुळे उद्योजकांनीच सुशोभीकरणाची शक्कल लढविल्याने, टपरीधारक आणि हॉकर्सचा कायमस्वरूपी बंदारेबस्त होत असल्याचे दिसून येत आहे. सर्वच उद्योजकांनी याकामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन औद्योगिक संघटनांकडून केले जात आहे.
कंपनीच्या कम्पाउंडबाहेरील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करून सुशोभीकरण करावे तसेच कॅमेरे बसविण्यात यावे जेणेकरून कोणी अतिक्रमण करण्याचे धाडस करणार नाही, अशा स्वरूपाचे आव्हान नाइसच्या वतीने करण्यात आले होते. त्यास उद्योजकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अन्य उद्योजकांनीही अशा प्रकारचे सुशोभीकरण करून अतिक्रमणाला आळा घालावा.
रमेश वैश्य, अध्यक्ष, नाइस, नाशिक.