

जागतिक बांबू दिनविशेष
नाशिक : अंजलि राऊत
पर्यावरणपूरक शेतीला आर्थिक समृद्धीची जोड देत बांबूला 'हरित सोने' म्हणून विकसित करण्याचा अभिनव प्रयोग लाखलगाव (रमाचे) येथील युवा शेतकरी प्रशांत आत्माराम दाते यांनी साकारला आहे.
पारंपरिक द्राक्षशेतीला पर्याय म्हणून त्यांनी बांबूशेतीची कास धरत देशाच्या विविध भागांतून ९६ हून अधिक दुर्मीळ बांबू प्रजातींचे संकलन व संवर्धन केले आहे. त्यांच्या या प्रयोगातून शाश्वत शेती, बांबू प्रक्रिया आणि शेतकऱ्यांसाठी रोजगाराच्या नव्या संधींची वाट निर्माण होत आहे.
अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता, शेतीत नवे प्रयोग करण्याचा निर्णय दाते यांनी घेतला. २०१६ मध्ये बांबू लागवडीची माहिती घेण्यास सुरुवात केली.
ओझरखेड, अमरावती, दापोली यांच्यासह देशातील विविध बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रांना भेटी देऊन त्यांनी माहिती मिळवली. २०१७ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून 'माणगा' जातीचे ५०० कंद घेऊन एक एकरावर लागवड केली. त्यानंतर विविध राज्यांतील संस्थांना भेटी देत बांबूच्या दुर्मीळ प्रजातींचे संवर्धन केले. दाते यांच्या प्रयोगाला आतापर्यंत सुमारे ५५० शेतकऱ्यांनी भेट देऊन मार्गदर्शन घेतले आहे. 'बांबू ग्रीन गोल्ड' या व्हॉट्सॲप समूहातून ते १८ राज्यांतील बांबू उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
जागतिक बांबू दिनानिमित्त '२०२६ - बांबू बियॉन्ड बॉर्डर्स' ही संकल्पना मांडण्यात आली. बांबूच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासोबत आर्थिक विकास, नवोपक्रम आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्याचा या संकल्पनेचा उद्देश आहे.
बांबू हे केवळ पीक नसून, पर्यावरण संवर्धनासोबत शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारे बहुउपयोगी साधन आहे. दुर्मीळ प्रजातींचे संवर्धन, आधुनिक प्रक्रिया आणि संशोधनाच्या माध्यमातून बांबूशेतीला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे. तरुणांनी पारंपरिक शेतीसोबत बांबूशेतीकडेही संधी म्हणून पाहावे. शाश्वत शेतीतून रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकाटी मिळू शकते.
- प्रशांत दाते, बांबू उद्योजक