

नाशिक : नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवरील हरकतींच्या पडताळणीला वेग आला आहे. आतापर्यंत ९७७२ पैकी तब्बल ५१८१ हरकतींची पडताळणी पूर्ण करण्यात आली असून त्रयस्थ व्यक्तींमार्फत घेण्यात आलेल्या हरकतींवरील सुनावणीसाठी ९५२ मतदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. निर्धारीत कार्यक्रमानुसार येत्या १० डिसेंबर रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द केल्या जाणार आहेत
महापालिका निवडणुकासाठी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ असल्याचे समोर आले आहे. या याद्यांमध्ये हजारो दुबार नावे, मयत व्यक्तींच्या नावांचा समावेश असून एका प्रभागातील मतदार लगतच्या दुसऱ्या प्रभागातील मतदार याद्यांमध्ये टाकण्यात आल्याने या मतदार याद्यांवर हरकतींचा अक्षरश: पाऊस पडला.
शिवसेना(उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, माकप या विरोधी पक्षां पाठोपाठ सत्ताधारी भाजप, शिवसेना शिंदे गटानेही या मतदार याद्यां विरोधात एल्गार पुकारला आहे. हरकतींचा आकडा वाढल्याने राज्य निवडणूक आयोगाने हरकती दाखल करण्यासाठी ३ डिसेंबर पर्यत मुदतवाढ दिली होती. या मुदतीअखेर हरकतींचा आकडा ९७७२ वर गेला आहे. महापालिकेच्या आजवरच्या निवडणूक इतिहासात प्रारूप मतदार याद्यांवर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर हरकती प्राप्त झाल्या आहेत. प्राधिकृत अधिकारी तथा उपायुक्त(प्रशासन) लक्ष्मीकांत साताळकर यांच्या नेतृत्वाखाली या हरकतींची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ५१८१ हरकतींची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. ४४६२ हरकती प्रलंबित आहेत.