

नाशिक : 2011 च्या जनगणनेनंतर जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांच्या रचनेत बदल झाला असल्यास, क्षेत्रनिहाय लोकसंख्येची रचना बदलली असल्यास गट आणि गणांची माहिती विहित नमुन्यात भरून पाठवावी, असे निर्देश ग्रामविकास विभागाने जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. यासंबंधीचे पत्र ग्रामविकास विभागाने गेल्या २५ फेब्रुवारीला जिल्हाधिकार्यांना पाठविले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका मागील पाच ते आठ वर्षांपासून रखडल्या आहेत. या काळात शहरी भागातील लोकसंख्या ग्रामीण भागात किंवा ग्रामीण भागातील लोकसंख्या शहरी भागात स्थलांतरित झाली असल्याची शक्यता आहे. याशिवाय नवीन ग्रामपंचायतींची स्थापना होणे, त्यांचा समावेश इतर तालुक्यात होणे, जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील काही गावांचा समावेश इतर जिल्ह्यात किंवा तालुक्यात होणे या प्रक्रियेमुळे ग्रामीण लोकसंख्येच्या रचनेत बदल होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील गट- गणांची अद्ययावत माहिती उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश ग्रामविकास विभागातर्फे जिल्हाधिकार्यांना प्राप्त झाले आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी क्षेत्रातील लोकसंख्या आणि प्रशासनिक पुनर्रचनेबाबत सविस्तर माहिती संकलित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशानुसार, तालुका आणि पंचायत समितीचे नाव, एकूण लोकसंख्या, अनुसूचित जाती व जमातींची लोकसंख्या, गाव, वाड्या-वस्त्या तसेच अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित भागांची माहिती संकलित करावी. याशिवाय, 2011 च्या जनगणनेनुसार तालुकानिहाय ग्रामीण लोकसंख्या, ग्रामपंचायती, वाड्या-वस्त्या, तांडे यांची माहितीही मागवण्यात आली आहे. 2011 नंतर ग्रामीण क्षेत्रात झालेल्या बदलांचा तपशील तसेच या कालावधीत नव्याने अस्तित्वात आलेल्या महानगरपालिका, नगर परिषदा व नगरपंचायतींच्या नावांसह त्यांच्या लोकसंख्येची आणि अनुसूचित जाती- जमातींच्या लोकसंख्येची माहितीही पाठविण्याचे निर्देश आहेत.