

सुरगाणा (नाशिक) : शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (दि. १९) सकाळी १०:३० वाजता बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची तपासणी केली. निपुण भारत अंतर्गत सुरू असलेल्या निपुण महाराष्ट्र उपक्रमाचा आढावा घेत त्यांनी विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन, गणना व पाढेगणतीच्या कौशल्याची थेट चाचणी केली.
यावेळी शाळा परिसरातील स्वच्छता, स्वच्छतागृहांची अवस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, शालेय पोषण आहार योजना आणि रंगरंगोटीचीही प्रत्यक्ष पाहणी झाली. विशेषतः पोषण आहाराबाबत मंत्री भुसे यांनी खिचडी तुम्ही स्वतः खाल्ली आहे का? असा थेट सवाल शिक्षकांना विचारत, आहाराचे गुणवत्तापूर्ण परीक्षण करूनच विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे आदेश दिले.
मंत्री भुसे यांनी शिक्षकांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. शालेय स्वच्छता, विद्यार्थ्यांचे आरोग्य, भौतिक सुविधा आणि "निपुण भारत" उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. फक्त कागदावर आकडे मांडून उपयोग नाही, प्रत्यक्ष बदल घडवायला हवा, अशा सूचना त्यांनी केल्या
यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक गवळी यांनी शाळेच्या भौतिक सुविधांवर लक्ष केंद्रित करत आवश्यक मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या प्रयत्नांचे शिक्षणमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. मंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठी खास आणलेला खाऊ स्वतः वाटप करत सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले.
वर्गातील एका विद्यार्थ्याच्या वाचनात अडथळा जाणवताच, त्या विद्यार्थ्याला संपादनूक पातळीपर्यंत नेण्यासाठी विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले. 15 दिवसांनंतर पुन्हा पाहणीसाठी येईन, असा इशाराही शिक्षण मंत्र्यांनी दिला. दरम्यान, गट शिक्षणाधिकारी अल्पा देशमुख यांच्याशी संवाद साधून, निपुण महाराष्ट्र उपक्रम अंमलबजावणीसाठी नियमित शाळा भेटी देण्यावर भर देण्याचे आदेशही दिले.