

नाशिक: ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म ड्रीम ११ व रमी गेम संदर्भातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात कार्यान्वयन संचालनालयाने (ईडी) नाशिकमध्ये छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे. ही कारवाई अत्यंत गोपनीयतेने करण्यात आल्याने नेमकी कुणावर आणि कोणत्या ठिकाणी छापे टाकण्यात आले, याचा तपशील अधिकृतपणे समोर आलेला नाही. मात्र, या कारवाईमुळे नाशिकमधील ड्रीम ११ व जंगली रमीशी संबंधित आर्थिक कनेक्शन उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ईडीकडून १९ डिसेंबरला जय कॉर्प लिमिटेड व कंपनीचे संचालक, उद्योगपती आनंदकुमार जैन यांच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देशभरात कारवाई सुरू करण्यात आली. या अंतर्गत नाशिकसह मुंबई, रायपूर आणि बंगळुरू येथे ३० हून अधिक ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. या कारवाईचा धागा ऑनलाइन फँटसी गेमिंग प्लॅटफॉर्म ड्रीम ११ पर्यंत जात असल्याचे समजते. ड्रीम ११ च्या मुंबईतील कार्यालयाशी संबंधित ठिकाणीही तपास करण्यात आली आहे. कंपनीचे सहसंस्थापक भाविश शेठ यांच्याशी संबंधित व्यवहारांची चौकशी सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार आनंद जैन यांचे ड्रीम ११ शी व्यावसायिक संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. ईडीचा तपास प्रामुख्याने रिअल इस्टेट क्षेत्रातील २४३४ कोटी रुपयांच्या कथित आर्थिक फसवणुकीवर केंद्रित आहे. गुंतवणूकदार व वित्तीय संस्थांकडून उभारलेला निधी परदेशातील शेल कंपन्या व ऑफशोअर खात्यात वळवण्यात आल्याचा संशय आहे. ऑनलाइन गेमिंग व तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित व्यवहारांचाही तपास सुरू आहे. या प्रकरणाची सुरुवात सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यावरून झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तपासाला गती देण्यात आली आहे. ईडीकडून जप्त कागदपत्रे, डिजिटल पुरावे व आर्थिक व्यवहारांची कसून तपासणी सुरू आहे. येत्या काळात नाशिकसह अन्य शहरातील आणखी काही कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे.