

नाशिक : मेफेड्रॉन ड्रग्ज अर्थात 'एमडी' तस्करीच्या गुन्ह्यात महिलांचा वाढता सहभाग धोक्याची घंटा ठरत आहे. या आधी इंदिरानगरमधील 'छोटी भाभी', ड्रग्जमाफिया ललित पानपाटीलची मैत्रिण प्रज्ञा कांबळे व अर्चना निकम यांना एमडी प्रकरणी गुन्ह्यात पकडले आहे. तर गत वर्षी ॉक्टोबर महिन्यात संशयित हिना शेख हिस तिचा पती व भावासह अंमली पदार्थाच्या साठ्यासह पकडले. त्यानंतर आता अंमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या तीन महिलांना पकडले. या तिनही महिला एमडीचे सेवन करता करता विक्री करत असल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे एमडी विक्री, साठा करणाऱ्यांमध्ये महिलांचा वाढता सहभाग पोलिसांसमोर आव्हान निर्माण करत आहे.
अंमली पदार्थविरोधी पथकाने मुंबई नाका परिसरातील खासगी ट्रॅव्हल्स थांब्याजवळ आणि हॉटेल सरोजमध्ये कारवाई करीत चौघांना एमडीसह पकडले. त्यापैकी गणेश कैलास गिते (४५, रा. मखलमलाबाद) याला सुरुवातीस अटक केली. त्यानंतर हॉटेल सरोजमध्ये मुक्कामी असलेल्या रूतुजा भास्कर झिंगाडे (रा. शिवाजी पार्क, सातपूर), स्विटी सचिन अहिरे (रा. श्रीधर कॉलनी, पेठरोड), पल्लवी निकुंभ उर्फ सोनाली शिंदे (रा. साईनगर, अमृतधाम) या तिघा संशयितांना ताब्यात घेतले. या चौघांनी त्यांचे तीन साथीदार फराण, शकील व महेश सोनवणे उर्फ जॉकी यांच्यासोबत संगनमताने 'एमडी'ची तस्करी केल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे.
या कारवाईत पथकाने चौघा संशयितांकडून ७० हजारांचे सहा मोबाइल, सुमारे साडे तीन लाख रुपयांचा ७२ ग्रॅम वजनाचा एमडी साठा दीड लाखांची दुचाकी, आठशे रुपयांचे दोन वजन काटे असा एकूण ६ लाख १३ हजार ३२० रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यातील इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
पोलिस तपासात संशयित पल्लवी निकुंभ ही एमडी विक्रीत 'मास्टरमाइंड' असल्याचे समोर येत आहे. तिच्या पतीविरोधात मध्यप्रदेशात एमडी प्रकरणी गुन्हा दाखल असून त्याने पल्लवीला एमडी विक्रीचा रस्ता दाखवल्याचे सुत्रांकडून समजते. पल्लवी ही मुंबईतून एमडी आणायची त्यामुळे तपासी पथक पुन्हा मुंबईत जाऊन एमडीचा शोध घेणार आहे. तसेच पकडलेले चारही संशयित एमडीचे सेवन करत असल्याचे समजते. तर संशयित झिंगाडेच्या पतीचा खून झाला असून, संशयित अहिरेचा पती खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कारागृहात आहे.