

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जाहीर केलेल्या दुष्काळी मदत अग्रीम अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील आतापर्यंत ४ लाख ४९ हजार ५७३ शेतकऱ्यांच्या खात्यांवर प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे एकूण २२४ कोटी ७८ लाख ६५ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे.
उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही मदत मिळावी, यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असून, शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधारशी लिंक करावे तसेच फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) तयार करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी दुष्काळी मदत अग्रीम देण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या मदतीचे वितरण गतीने आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, अशा पद्धतीने करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून मदत वितरणाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांपैकी ज्यांना अद्याप दुष्काळी मदत अग्रीम प्राप्त झालेला नाही, त्यांच्यासाठी आवश्यक पडताळणी व प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे. कोणताही पात्र शेतकरी तांत्रिक किंवा कागदपत्रांतील त्रुटींमुळे मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी शेतकऱ्यांनी आपली माहिती अद्ययावत ठेवून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी.
- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक
दुष्काळी मदत अग्रीमचा लाभ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे.
यासाठी शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असल्याची खात्री करावी.
फार्मर आयडी तयार करून घ्यावा. आधार लिंक नसणे, बँक खात्याशी संबंधित त्रुटी किंवा फार्मर आयडी उपलब्ध नसणे यामुळे मदत वितरणात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी.