

नाशिक : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने फटाके वाजविण्यासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. रात्री दहा ते सकाळी ६ दरम्यान फटाके वाजविण्यावर निर्बंध घालताना मोकळ्या जागेतच फटाके वाजविण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
केंद्र सरकारच्या वतीने दरवर्षी जल, वायू व ध्वनिप्रदूषणासंदर्भात अहवाल सादर केले जातात. हवा प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या कार्यक्रमांतर्गत सर्वाधिक स्वच्छ हवेची शहरे तसेच प्रदूषणग्रस्त शहरांची यादी जाहीर केली जाते. 'स्वच्छ, सुंदर, हरित शहरा'ची बिरूदावली मिरवणाऱ्या नाशिकचा देशातील स्वच्छ हवा असलेल्या शहरांच्या यादीत २३ वा क्रमांक आहे. दिवाळीत केल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेच्या प्रदूषणात भर पडणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नियमावली सादर केली आहे. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा हवाला देत रात्री दहापासून सकाळी ६ पर्यंत फटाके न फोडण्याचे तसेच फटाके गर्दीच्या ठिकाणी न फोडता मोकळ्या जागेत फोडावेत. फटाक्यांमुळे हवा व ध्वनिप्रदूषण होते. यामुळे प्राणिमात्रांनाही इजा होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी. अठरा वर्षाखालील मुलांसमवेत प्रौढ व्यक्ती असल्याशिवाय फटाके वाजवू नये. फटाके उडविणाऱ्या जागेपासून चार मीटरपर्यंत १२५ डेसिबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांच्या वापरावर बंदी आहे. या नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
दिवाळीत फटाके वाजवण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महापालिकेने नियमावाली तयार केली असून, नागरिकांनी नियमावलीचे पालन करावे.
- अजित निकत, पर्यावरण उपायुक्त