Nashik Diwali | विशेष मोहीमेत १४ लाखांचे भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त
नाशिक : दिवाळीत दूध व दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, नमकीन, फरसाण, खाद्यतेल, वनस्पती, घी (तूप), आटा, रवा, मैदा, बेसन, ड्राय फ्रुटस, चॉकलेट्स व तत्सम अन्न पदार्थांची मागणी जास्त असल्याने, नफा मिळविण्याच्या उद्देशाने या पदार्थांमध्ये भेसळ करण्याचे प्रकार या काळात सर्वाधिक असतात. या भेसळखोरांंवर वचक ठेवता यावा, यासाठी अन्न प्रशासनाकडून १ सप्टेंबरपासून विशेष मोहीम राबविली जात असून, या मोहिमेदरम्यान, १४ लाख किंमतीचे भेसळयुक्त पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
सणासुदीत जादा नफा कमाविण्याच्या उद्देशाने भेसळखोर सक्रीय होतात. जिल्हाभरात केलेल्या विविध कारवायांमध्ये सुमारे १३ लाख ८६ हजार ६९० रुपये किंमतीचे अन्न पदार्थ जप्त केले आहेत. हे पदार्थ विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. पुढील काही दिवस ही कारवाई सुरूच राहणार असून, भेसळीचा संशय आल्यास संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्हाभरात केलेल्या कारवाया
- दूध व दुग्धजन्य पदार्थ जसे पनीर, घी या पदार्थांचे २२ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेवून भेसळीच्या संयशयावरून ५६३ किलो ग्रॅमचा साठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत ९९ हजार ५७० रुपये इतकी आहे.
- मिठाई व नमकिन या अन्न पदार्थांचे एकूण ३२ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेवून भेसळीच्या संशयावरून २१९ किलो ग्रॅम पदार्थ जप्त करण्यात आले. त्याची किंमत ३१ हजार ३५० रुपये इतकी आहे.
- रवा, मैदा, बेसन, भगर आदी अन्न पदार्थांचे एकूण १९ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेवून भेसळीच्या संशयावरून ८६६ किलो ग्रॅमचा साठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत ८६ हजार ६०० रुपये इतकी आहे.
- खाद्यतेल अन्न पदार्थांचे १६ अन्न नुमने विश्लेषणासाठी घेवून भेसळीच्या संयशयावरून १०९२ किलो ग्रॅम साठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत दोन लाख ९७ हजार ४४० रुपये इतकी आहे.
- सणासुदीच्या काळात वापरण्यात येणारे इतर अन्न पदार्थ जसे चहा, शितपेय, मसाले आदीचे दहा अन्न नमुने विश्लेषणासाठी घेवून भेसळीच्या संशयावरून १९२८ किलो ग्रॅम साठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत ८ लाख ७१ हजार ७३० रुपये इतकी आहे.

