

नाशिक : नामदेव भोर
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अर्थात 'एसआयआर'नंतर जाहीर झालेल्या प्रारूप मतदारयादीच्या आकडेवारीने नाशिक जिल्ह्याच्या निवडणूक यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. सांख्यिकी विभागाच्या ऑगस्ट २०२६ च्या अंदाजानुसार जिल्ह्यात १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या ५० लाख ९८ हजार ८०६ आहे. मात्र, 'एसआयआर'नंतरच्या प्रारूप मतदारयादीत ४० लाख ७६ हजार ६६६ मतदारांची नोंद झाली आहे.
त्यामुळे दोन्ही आकडेवारीतील तब्बल १० लाख २२ हजार १४० ची तफावत भरून काढण्यासाठी निवडणूक विभागाला मोठी कसरत करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या जिल्हानिहाय आकडेवारीनुसार नाशिक जिल्ह्याची ऑगस्ट २०२६ मधील अंदाजित लोकसंख्या ७० लाख ७ हजार ५४१ आहे.
त्यापैकी १८ वर्षांवरील अंदाजित लोकसंख्या ५० लाख ९८ हजार ८०६ आहे. त्या तुलनेत प्रारूप मतदारयादीतील संख्या ४० लाख ७६ हजार ६६६ आहे. परिणामी, जिल्ह्याच्या मतदार लोकसंख्येचे प्रमाण (ईपी रेशो) ७९.९५ टक्के इतका असून, विभागात सर्वाधिक तफावत नाशिकमध्ये दिसून येत आहे.
नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांच्या आकडेवारीत नाशिकमध्ये मतदार संख्येची तफावत सर्वाधिक आहे. धुळे जिल्ह्यात १६ लाख ८१ हजार ६५२ पात्र लोकसंख्येच्या तुलनेत १५ लाख ४० हजार २६८ मतदार असून, १ लाख ४१ हजार ३८४ मतदारांची तफावत आहे. जळगावमध्ये ५ लाख ५३ हजार ५ मतदार, तर नंदुरबारमध्ये १ लाख ६ हजार ३१२ मतदारांची तफावत आहे.
दुसरीकडे, अहिल्यानगरमध्ये अंदाजित १८ वर्षांवरील लोकसंख्येपेक्षा ७६ हजार ५३२ मतदार अधिक असल्याचे आकडेवारीत दिसून येते. विभागातील पाच जिल्ह्याची एकत्रित तफावत १७ लाख ४६ हजार ३०९ इतकी आहे. त्यापैकी तब्बल १० लाख २२ हजार १४० ची तफावत एकट्या नाशिक जिल्ह्यात आहे.
नवमतदार नोंदणीवर भर:
'एसआयआर' प्रक्रिया वगळली गेलेली नावे, स्थलांतरित नागरिक, नव्या वसाहतींमधील रहिवासी तसेच १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांची मतदार म्हणून नोंदणी याकडे आता निवडणूक यंत्रणेला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
प्रारूप आकडेवारीतील तफावत प्रत्यक्षात किती पात्र नागरिक मतदारयादीबाहेर आहेत, हे दावे-हरकती आणि त्यानंतरच्या पडताळणी प्रक्रियेत स्पष्ट होणार आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारयादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्याबरोबरच पात्र नागरिकांचा समावेश करण्याचे मोठे आव्हान जिल्हा निवडणूक यंत्रणेसमोर आहे.
आकडेवारी तक्ता (जिल्हा : नाशिक):
२०११ ची लोकसंख्या: ६१ लाख ७ हजार १८४
ऑगस्ट २०२६ अंदाजित लोकसंख्या: ७० लाख ७ हजार ५४१
१८ वर्षांवरील अंदाजित लोकसंख्या: ५० लाख ९८ हजार ८०६
एसआयआर प्रारूप यादीतील मतदार: ४० लाख ७६ हजार ६६६
तफावत (वाढवायचे मतदार): १० लाख २२ हजार १४०
मतदार लोकसंख्येचे प्रमाण: ७९.९५ टक्के