

ठळक मुद्दे
कोणतेही संशयास्पद स्फोटक आढळले नाही
नागरिकांसह पोलिस यंत्रणेने सोडला सुटकेचा निश्वास
सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी मिळाल्याने गुरुवारी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. देशातील महत्त्वाच्या न्यायालयांना बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई- मेल प्राप्त झाल्यानंतर नाशिक न्यायालयात ही खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस यंत्रणा तत्काळ सतर्क झाली. यामुळे न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला.
धमकीची माहिती मिळताच पोलिस आयुक्तालयाच्या बॉम्ब शोधक व निकामी पथकाला (बीडीडीएस) तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. न्यायालयीन कामकाज सुरू असतानाच अचानक वाढलेल्या हालचालींमुळे न्यायालय परिसरात काही काळ गोंधळाचे व भीतीचे वातावरण पसरले. न्यायालयात आलेले वकील, पक्षकार, कर्मचारी तसेच नागरिकांची धावपळ उडाल्याचे चित्र दिसून आले.
बॉम्ब शोधक पथकाने न्यायालयाची मुख्य इमारत, सभागृह, पार्किंग परिसर तसेच आजूबाजूचा संपूर्ण भाग अत्यंत बारकाईने तपासला. श्वान पथक व आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने करण्यात आलेल्या तपासणीत कोणताही संशयास्पद पदार्थ किंवा स्फोटक आढळून आले नाही. सखोल तपासणीनंतर सदर धमकी ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले.
तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने नागरिकांना दिलासा देत परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिली. धमकी अफवा ठरल्याचे निष्पन्न झाल्यानंतर न्यायालय परिसरातील नागरिक, कर्मचारी व पोलिस यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकला. काही काळासाठी विस्कळीत झालेले न्यायालयीन कामकाज त्यानंतर सुरळीत करण्यात आले.
दरम्यान, अशा प्रकारच्या धमकीमुळे सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक भीती निर्माण होत असून कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, असे पोलिस प्रशासनाने नमूद केले. धमकी देणाऱ्या ई-मेलचा स्रोत शोधण्यासाठी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वकिलांनी केली. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास तत्काळ पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
न्यायालयात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच तात्काळ बॉम्बशोध पथक तेथे दाखल झाले सर्व परिसर परिसराची तपासणी करण्यात आली मात्र बॉम्ब सदृश्य कुठलीही वस्तू आढळून आली नाही.
मोनिका राऊत, पोलिस उपायुक्त, परिमंडळ १
नाशिकची इमारत प्रमुख न्यायालयाच्या इमारतींपैकी
नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाची नूतन इमारतीचे उद्घाटन अलिकडेच तत्कालीन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या उपस्थितीत झाले आहे. सदर इमारत ही देशातील प्रमुख न्यायालयाच्या इमारतीपैकी एक सुंदर आकर्षक व प्रशस्त इमारत म्हणून सध्याच्या घडीला त्याकडे बघितले जात आहे त्यामुळे प्रशासन व पोलिस यंत्रणा अधिकच सावध झाली.