

नाशिक : मुख्यमंत्री सचिवालयातंर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष तथा धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालयाच्या समन्वयाने नाशिक जिल्ह्यात २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत समुदाय आरोग्य शिबिर आयोजित केले जात आहे. या शिबिरात नागरिकांना मोफत आरोग्य चिकित्सा व उपाचारार्थ मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार मंजुषा घाटगे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि.26) आयोजित बैठकीत घाटगे बोलत होत्या. यावेळी मुख्यमंत्री सहाय्य निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नाशिकचे कक्ष प्रमुख डॉ. चैतन्य बैरागी, सहाय्यक आयुक्त धर्मादाय आयुक्तालय श्रीमती मटाले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, वैद्यकीय अधिक्षक प्रकाश भोये, आरोग्य विस्तार अधिकारी विठ्ठल पाटील, अति. वैद्यकीय अधिकारी डॉ. नामपूरकर, डॉ. अतुल धामणे, सीएमआरएफच्या जिल्हा समन्वयक डॉ. दीपाली लोढा, जिल्हा समन्वयक (एम.जे.पी.जे.ए.वाय) डॉ. दाभाडे यांच्यासह दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे वैद्यकीय अधिकारी व गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सवात हा आरोग्य विषयक उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमाला आरोग्य विभागातील कर्मचारी, आरोग्य विज्ञान विद्यापीठ संलग्नित विविध वैद्यकीय महाविद्यालयतील वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय विद्यार्थी व निमवैद्यकीय कर्मचारी मदत करणार आहे. जिल्ह्यात 42 सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. शिबिरात रूग्णांची प्राथमिक तपासणी, मोफत रक्त चाचण्या, ईसीजी आदी तपासण्या केल्या जाणार आहेत. ज्या रूग्णांना पुढील उपचारांची गरज आहे त्यांना आरोग्य विषयक शासकीय योजनांतून उपचारार्थ मार्गदर्शनपर सहाय्य केले जाणार आहे. या उपक्रमांची जनजागृती केली जाणार आहे. शिबिरात आलेल्या नागरिकांची नोंदणी करून त्यांनतर त्यांची आरोग्य तपासणी व मार्गदर्शन केले जाणार असल्याचे डॉ. बैरागी यांनी यावेळी सांगितले. 'श्रीगणेशा आरोग्याचा' अभियानाबाबत वेळोवळी मार्गदर्शनपर सूचना व्हॉट्सप ग्रुपवर देण्यात येतील, अशी माहिती घाटगे यांनी दिली.