

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत १२ जुलैपर्यंत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, ज्या नागरिकांना ऑनलाइन स्वयं-नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नाही, त्यांनी या शिबिरांचा लाभ घेऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या मदतीने नोंदणी अर्ज भरावा, असे आवाहन निवडणूक विभागातर्फे करण्यात आले आहे.
या विशेष शिबिरांच्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी शनिवारी (दि. ११) जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १२४ नाशिक मध्यच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, १२३ नाशिक पूर्व मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन हिरे, १२५ नाशिक पश्चिमच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शुभांगी भारदे, १२६ नाशिकरोड-देवळाली मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शर्मिला भोसले, तहसीलदार माधुरी आंधळे तसेच अपर तहसीलदार अमोल निकम उपस्थित होते.
यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपल्या आपल्या मतदारसंघात मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी भेट देऊन नागरिकांकडून स्वयं नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घेत असून, मतदार नोंदणी अधिक अचूक व अद्यावत करण्यासाठी व्यापक जनजागृतीही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ऑनलाइन प्रक्रिया करता येत नसलेल्या मतदारांनी १२ जुलैपर्यंत आपल्या संबंधित मतदान केंद्रावर जाऊन बीएलओ यांच्या मदतीने स्वयं नोंदणी अर्ज भरावा. मतदान केंद्रावर येताना मतदार ओळखपत्र (इपिक) तसेच आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
३० जून ते २९ जुलै २०२६ : घरोघरी जाऊन नोंदणी अर्जांचे वितरण
५ ऑगस्ट २०२६ : प्रारूप मतदारयादीचे प्रकाशन
५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ : दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी
५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२६ : दावे व हरकतींचा निपटारा
७ ऑक्टोबर २०२६ : अंतिम मतदारयादीचे प्रकाशन