देवळाली कॅम्प : देवळाली विधानसभा मतदारसंघ 90 टक्के ग्रामीण भागात मोडत असताना दहा टक्के शहरी भाग असलेल्या विहितगाव परिसरात शिवस्वराज्य यात्रेनिमित्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटांमध्ये धुसफुस निर्माण झाली. शहरी भागात मेळावा घेऊन नेमके काय साध्य करायचे, असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करू लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने सुरू झालेली शिवस्वराज्य यात्रा गुरुवार (दि.२५) तारखेला नाशिक व देवळाली मतदारसंघामध्ये येत आहे. यात्रेच्या स्वागतासाठी तालुकाध्यक्ष रामकृष्ण झाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. शिवस्वराज्य यात्रा गुरुवार (दि.२५) रोजी विहितगाव येथील साईग्रँड लाॅन्स येथे पोहोचणार आहे.
सकाळी ११ वाजता प्रदेश अध्यक्ष आमदार खा. डॉ. अमोल कोल्हे व युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांची जाहीर सभा होणार आहे. मेळावा व सभा विहितगाव येथील लॉन्स होत आहे. हा परिसर नाशिक शहरात मोडत असून, देवळाली मतदारसंघात येथील एका प्रभागाचा समावेश आहे, तर भगूर, देवळाली या शहरासह 64 खेडे ग्रामीण भागात मोडतात.
सिन्नर, इगतपुरी व नाशिकच्या सीमेवर असलेल्या भगूर-देवळाली परिसरात हा मेळावा व सभा घेतली गेल्यास तीनही तालुक्यांतील कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकते. देवळाली कॅम्प, भगूरसह दारणा काठाच्या पट्ट्यामध्ये एक लाख मतदान असताना या भागात मेळावा होणे अपेक्षित होते. मात्र, पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागाचा विचार न करता आपल्या सोयीनुसार विहितगाव येथे मेळावा व सभा निश्चित केली. त्यामुळे ग्रामीण भागातील पक्षाचे कार्यकर्ते नाराजी व्यक्त करीत आहेत.
देवळाली कॅम्प येथे या कार्यकर्त्यांची बैठकही झाली. वास्तविक देवळाली कॅम्प हे शहर मतदारसंघातील सर्वात मोठे मतदार असलेले शहर आहे. लगत भगूर शहर व दारणा पट्ट्यातील बेलतगव्हाण, शेवगेदारणा, संसरी, राहुरी, दोनवाडे, लहवित, वंजारवाडी, लोहशिंगवे, शिंगवेबहुला या पट्ट्यामध्ये सुमारे 90 हजार ते एक लाखापर्यंत मतदान आहे.
मागील 2019 च्या पंचवार्षिकमध्ये या भागातून राष्ट्रवादीचे आ. सरोज आहिरे यांना मोठे मताधिक्य देण्यात आले होते. राष्ट्रवादी पक्षाचा मतदार हा शरद पवार यांच्या विचारांचा अनुयायी असून, आजही पक्षाला मानणारा आहे. परंतु पक्षाकडून होत असलेल्या सभांचे नियोजन हे कार्यकर्त्यांना न्याय देणारे नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.