

दिंडोरी ( नाशिक ) : तालुक्यात ऊस तोडणी वेळेवर होत नसल्याने ऊस उत्पादक शेतकर्यांनी करंजवण येथील कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गटला टाळे लावत संताप व्यक्त केला. नोव्हेंबरमध्ये कादवा सहकारी साखर कारखान्याचे गाळप सुरु झाले मात्र, महिना उलटूनही करंजवण परिसरातील ऊस तोडणीस सुरूवात न झाल्याने शेतकर्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन- तीन दिवसांत तोडणी टोळ्या दाखल न झाल्यास कारखाना बंद करण्याचा इशारा ऊस उत्पादकांनी दिला आहे.
अतिवृष्टीमुळे यावर्षी सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकर्यांची सर्व भिस्त ऊस पिकावर अवलंबून आहे. त्यामुळे ऊस तोडणी वेळेत झाली तर शेतकर्यांना फायदा होवू शकतो. मात्र, दुसर्या बाजूचा विचार केल्यास ऊस तोडणी वेळेवर न झाल्यास वजनात घट होऊन ऊस उत्पादकांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागणार आहे. अतिवृष्टीमुळे परिसरातील ऊस आडवे पडले असून ऊसाला उंदीर लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ऊस आडवे पडल्यामुळे ऊसाला पाणी देता येत नाही. तसेच माळरानावरील ऊस वाळण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कादवा सहकारी साखर कारखान्याने गाळप कशासाठी वाढविले आहे? गाळप वाढवूनही दरवर्षी या परिसरातील ऊस तोडणी ऊशिरा का होते असा सवाल उत्पादकांकडून केला जात आहे. सध्या कादवा कारखान्याचे संचालक मंडळ ऊस उत्पादकांना भावनिक करीत आहेत. याप्रसंगी उपसरपंच प्रकाश देशमुख, माजी उपसरपंच रवींद्र मोरे, सदनराव मोरे, संजय मोरे, डॉ. विष्णू मोरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
वजनात घट हाेऊन नुकसान
एक ते दोन महिने ऊस तोडणीला उशिरा झाल्यास 10 ते 15 टनाचे नुकसान होते. हे शेतकर्यांचे नुकसान कोण भरवून देणार? यासाठी कादवा कारखान्याने करंजवण परिसरामध्ये त्वरीत 15 ते 20 टोळ्या तातडीने पाठवाव्यात अन्यथा कादवा कार्यक्षेत्रावर आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकर्यांनी दिला आहे.