Nashik- आदिमायेच्या चरणी भाविकांची मांदियाळी

Nashik temple devotees- कावड यात्रांचा उत्साह, तृतीयपंथींच्या पारंपरिक मेळाव्याने वेधले लक्ष
Nashik temple devotees
सप्तशृंगगड : कोजागरी पौणिमेनिमित्त काढण्यात आलेल्या छबिना मिरवणुकीतील देवीची विविध रूपे तसेच सहभागी भाविक.
Published on: 
Updated on: 

सप्तशृंगगड : आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर कोजागरी पौर्णिमेनिमित्त भक्तीचा महासागर उसळला. 'आई राजा उदो उदो'च्या घोषाने अवघा गड दुमदुमला असून, महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि गुजरातमधून तीन लाखांहून अधिक भाविकांनी आदिमाया श्री सप्तशृंगीमातेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. शेकडो कावड यात्रा, ढोल ताशांचा गजर, कुंकवाची उधळण आणि तृतीयपंथींचा पारंपरिक धार्मिक मेळावा यामुळे गडावर भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा अनोखा संगम पाहायला मिळाला.

नवरात्रोत्सवानंतर येणाऱ्या कोजागरी पौर्णिमेच्या पर्वासाठी गडावर पूर्वसंध्येपासूनच भाविकांची रीघ लागली होती. विविध भागांतून पदयात्रा करीत आलेल्या कावडधारकांनी वाद्यांच्या गजरात आणि 'सप्तशृंगीमाता की जय'च्या घोषणांनी गडाचा परिसर भक्तिमय झाला होता. ताशांचा कडकडाट आणि मुक्तहस्ते उधळल्या जाणाऱ्या कुंकवामुळे कावड व पालखी मिरवणुकांनी उत्सवात विशेष रंग भरला होता.

रविवारी (दि. २५) सकाळच्या सत्रात आमदार गोकुळ गिते आणि विश्वस्त संस्थेचे देणगीदार भाविक सुदर्शन हेगडे यांनी सपत्नीक श्री भगवतीची पंचामृत महापूजा केली. सायंकाळी विविध ठिकाणांहून कावडधारकांनी आणलेल्या पवित्र जलाने देवीला अभिषेक करण्यात आला. सायंकाळची महापूजा विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा धर्मादाय सहायक आयुक्त विवेक सोनुने यांनी सपत्नीक केली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनीही देवीचे दर्शन घेतले. कळवणच्या उपविभागीय अधिकारी कश्मिरा संख्ये, तहसीलदार रोहिदास वारुळे आदी उपस्थित होते.

तृतीयपंथींचा पारंपरिक मेळावा

राज्यभरातून आलेल्या तृतीयपंथींनी पवित्र शिवालय तलावावर विधिवत स्नान करून पूजा अर्चा केली. त्यानंतर प्रमुख गुरूंच्या नेतृत्वाखाली वाजतगाजत छबिना मिरवणूक काढली. परंपरेनुसार गुरूंकडून नवीन शिष्यांना दीक्षा देण्याचा धार्मिक विधी पार पडला. रात्रभर देवीचा जागर करून नवसपूर्ती केली. या पारंपरिक सोहळ्याने उत्सवातील धार्मिक आणि सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडविले.

प्रशासनाची कसोटी

लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होणार असल्यामुळे संभाव्य वाहतूक कोंडी आणि गर्दीचे आव्हान लक्षात घेऊन, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टने नियोजन केले होते. नांदुरी ते सप्तशृंगगड या मुख्य मार्गावर खासगी वाहनांना बंदी घातली होती. भाविकांच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाने शेकडो विशेष बसगाड्यांची व्यवस्था केली. टप्प्याटप्प्याने भाविकांना गडावर आणले. दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची आणि वैद्यकीय सुविधांची व्यवस्था केली होती. ट्रस्टने महाप्रसादाचे आयोजन केले होते. पिंपळनेर येथील विश्वरुहानी मानव केंद्रानेही महाप्रसादासह वैद्यकीय शिबिर आयोजित केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news