

नाशिक : नाशिक महापालिकेत सानुग्रह अनुदानावरून रंगलेल्या श्रेयवादात शिवसेना ठाकरे गटाची सरशी झाली असून राज्यात सत्तेवर असूनही भाजपला तोंडघशी पडावे लागले आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याच्या निर्णयाचे ठाकरे गट प्रणित म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने श्रेय घेतल्यानंतर पेटून उठलेल्या भाजपने अनुदानाच्या रकमेत बदल करण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. परंतू आयुक्तांनी ती फेटाळून लावली असून, पुर्वीचाच निर्णय कायम ठेवत यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. (Decision to give 20 thousand rupees grant to Nashik Municipal Corporation employees in Diwali 2024)
दरवर्षी दिवाळीनिमित्त महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले जाते. यंदा सर्व अधिकारी, कर्मचारी, फिक्स पे वरील कर्मचारी, प्राथमिक शिक्षक व रोजंदारीवरील कर्मचारी, मानधनावरील कर्मचारी, मानद वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी मुख्यसेविका, सेविका आणि मदतनिस, अंशकालिन शिक्षक, शिक्षण विभागातील कर्मचारी, एनयुएचएम, एनयुएलएम कर्मचारी, क्षयरोग नियंत्रण सोसायटीतील कर्मचारी यांना वाढत्या महागाईनुसार २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेसह महापालिकेतील विविध कर्मचारी संघटनांकडून आयुक्तांकडे करण्यात आली होती. आयुक्तांनी या मागणीची दखल घेत अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला.
यासंदर्भातील ठरावही गत महासभेत संमत करण्यात आला. म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या मागणीनुसार आयुक्तांनी हा निर्णय घेतल्याचे संघटनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी जाहीर केले. भाजपची संघटना तोपर्यंत निंद्रीस्त होती. म्युनिसिपल सेनेने श्रेय घेतल्यानंतर भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे यांच्यासह आयुक्तांची भेट घेत नाराजी व्यक्त केली. सानुग्रह अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याची मागणी केली. मात्र आयुक्तांनी यासंदर्भातील आदेश जारी करत अनुदानाच्या रकमेत कोणतीही वाढ केलेली नाही. नियमित कर्मचाऱ्यांना २० हजार तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.
महापालिकेतील ४५०० कायम, मानधनावरील कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी यांना प्रत्येकी २० हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. तर शासन अनुदानातून मानधन घेणाऱ्या क्षयरोग नियंत्रण, हिवताप व एड्स नियंत्रण सोसायटी, बूस्टर पंपिंग स्टेशन, समग्र शिक्षा अभियान, एन.यु.एच.एम, एन.यु.एल.एम., आशा कर्मचारी, युनिसेफ अशा सहा महिेन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून महापालिकेत कार्यरत असलेल्या ५५० कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या तिजोरीवर ९.५५ कोटींचा बोझा पडणार आहे.