

नाशिक : शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू असून, सोमवारी (दि.23) सहा अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले आहे. यात प्राथमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांची धारशिव जिल्हा परिषदेत प्राथमिक उपशिक्षणाधिकारीपदावर बदली झाली आहे. तर, माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी प्रकाश आहिरे यांची लातूर जिल्हा परिषदेत उपशिक्षणाधिकारी म्हणून बदली झाली आहे.
अधिकाऱ्यांनी चुकीचे कामकाज केले की, त्यांना शिक्षा म्हणून विदर्भात बदली दिली जाते असे मानले जाते. आता शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या थेट विदर्भ, मराठवाड्यात बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांचे नेमके काय चुकलं अशी चर्चा शिक्षण विभागात रंगली आहे. गेल्या आठवड्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची बदली झाली.
नाशिक जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांची थेट विदर्भातील गडचिरोली येथे बदली झाली. बच्छाव यांच्या कार्यकाळात माॅडेल स्कूल, स्पेलिंग बी तसेच सुपर फिफ्टी सारखे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. सुपर फिफ्टी उपक्रमाची राज्यभर चर्चा झाली. बच्छाव यांच्या कामकाजाचे खुद्द शिक्षणमंत्र्यांनी कौतुक केले होते. असे असतानाही त्यांची बदली गडचिरोलीत झाल्याने आर्श्चय व्यक्त केले जात आहे. तसेच माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांना चंद्रपूरला पाठविले. शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या होऊन अवघे काही दिवस झालेले असताना सोमवारी उपशिक्षणाधिकारी कनोज यांची त्याच पदावर धाराशिव जिल्ह्यात बदली झाली. तसेच माध्यमिकचे प्रकाश अहिरे यांची लातूर जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी म्हणून बदली झाली. नाशिक जिल्ह्यातील अधिकारी थेट विदर्भ आणि मराठवाड्यात का पाठविले जात आहेत, याविषयी शिक्षण विभागात आता उलटसुलट चर्चा सुरू आहे.