

नाशिक : पाच महिन्यांपूर्वीच नाशिक महापालिकेच्या उपायुक्तपदी रुजू झालेल्या संगीता नांदूरकर यांच्याकडील अतिक्रमण निर्मूलन विभागाचा कार्यभार महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी काढून घेतला असून, त्यांना महापालिका सेवेतून तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले आहे. अन्य उपायुक्तांच्या जबाबदाऱ्यांतही मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आल्याने महापालिकेत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
सप्टेंबर २०२५ मध्ये संगीता नांदूरकर यांची धुळे महापालिकेतून नाशिक महापालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती झाली होती. उपायुक्त सुवर्णा दखणे या मातृत्व रजेवर गेल्याने त्यांच्याकडील अतिक्रमण निर्मूलन विभाग तसेच माहिती व तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी नांदूरकर यांच्याकडे सोपविण्यात आली होती. दखणे या मातृत्व रजेवरून परतल्यानंतर गेल्या २५ दिवसांपूर्वीच उपायुक्त अजित निकत यांच्याकडील करवसुली विभागाचा कार्यभार दखणे यांच्याकडे देण्यात आला होता. तर निकत यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. दरम्यान, अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कारभाराविषयी आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यासंदर्भात आयुक्तांनी नांदूरकर यांना जाबही विचारला होता. त्यानंतरही नांदूरकर यांच्या कामकाजात सुधारणा न झाल्याने त्यांच्याकडील अतिक्रमण निर्मूलन विभागाची जबाबदारी काढून त्यांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची पालिका वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा आहे.
नांदूरकर यांच्याकडील कार्यभार काढताना अन्य उपायुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदलाचे आदेश आयुक्त खत्री यांनी शुक्रवारी (दि. २७) जारी केले आहेत. नांदूरकर यांच्याकडील अतिक्रमण विभाग व जाहिरात परवाना विभाग सुवर्णा दखणेंकडे सोपविण्यात आला आहे. याशिवाय दखणे यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान विभाग, राष्ट्रीय फेरीवाला धोरण, सुरक्षा विभाग, राष्ट्रीय नागरी उपजीविका विभाग व स्लम विभागाची जबाबदारी ठेवण्यात आली आहे. दखणे यांच्याकडील कर विभाग पुन्हा निकत यांच्याकडे देण्यात आला आहे.
उपायुक्त अजित निकत यांच्याकडे कर विभाग, मिळकत विभागाची जबाबदारी सोपविताना त्यांच्याकडील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालकपदाचा कार्यभार वैद्यकीय अधिकारी डॉ. आवेश पलोड यांच्याकडे देण्यात आला आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार पलोड यांनी तत्काळ घनकचरा व्यवस्थापन विभागाचा कार्यभार स्वीकारला आहे.
उपायुक्त संगीता नांदूरकर यांच्याकडील अतिक्रमण निर्मूलन व माहिती तंत्रज्ञान विभागाचा कार्यभार उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत सोपविताना प्रशासकीय महत्त्वाच्या बाबींची टिपणी, संगणकीय आयडी, पासवर्ड, ई-प्रणालीबाबतचे पासवर्ड घेऊन दखणे यांच्याकडे सोपविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. सदर आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करताना आदेशाची नोंद नांदूरकर यांच्या सेवापुस्तकात घेण्याचे निर्देश आयुक्त खत्री यांनी प्रशासनाला दिले आहेत.
नाशिक महापालिकेत उपायुक्तांची पाच पदे मंजूर आहेत. उपायुक्तपदाच्या पाचही जागा भरलेल्या असताना नांदूरकर यांची महापालिकेत उपायुक्त म्हणून शासनाने बदली केली होती. सुधारित आकृतिबंध मंजुरीच्या अपेक्षेवर नांदूरकर यांना महापालिकेत उपायुक्तपदी रुजू करून घेण्यात आले होते. परंतु, आकृतिबंध अद्याप मंजूर होऊ शकलेला नाही. त्यामुळे नांदूरकर यांचे उपायुक्तपद अतिरिक्त ठरत होते.