

Deola taluka unseasonal rain
देवळा : तालुक्यात सोमवारी (दि. ३०) विठेवाडी व परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे डाळिंब व कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. ३१) आमदार डॉ. राहुल आहेर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
सोमवारी सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास लोहोणेर, विठेवाडी, भऊर, देवळा, खर्डे, वाजगाव, कणकापूर, शेरी, वार्शी, हनुमंत पाडा, वाखारवाडी आदी भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. विठेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्याने डाळिंब, उन्हाळी कांदा, तसेच टरबूज, पपई आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेले उत्पन्न नष्ट झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
मंगळवारी दुपारी सुमारे १२ वाजता आमदार आहेर यांनी विठेवाडी व झिरेपिंपळ परिसरातील नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली. यावेळी डाळिंब उत्पादक शेतकरी सुभाष दत्तू निकम व माधव नारायण निकम यांच्या बागांचे तसेच कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. आमदारांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर दिला व उपस्थित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
या वेळी तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी सीताराम पाखरे, कृषी सहाय्यक विनोद जाधव, तलाठी पूनम अहिरे, उपकृषी अधिकारी मनीषा जाधव, ग्रामसेवक योगेश सूर्यवंशी यांच्यासह भाजप तालुका अध्यक्ष किशोर आहेर व परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.