

देवळा ( नाशिक ) : तालुक्यातील वाखारीच्या कापराई आणि चिंचबारी शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला आहे. शेतकऱ्यांवर हल्ल्यांच्या घटना वाढू लागल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शुक्रवार (दि.21) रोजी वाखारवाडी येथील अक्षय हिरामण निकम (वय 19) हा युवक सायंकाळी पाचच्या सुमारास मोटारसायकलने चांदवडहून येत असताना चिंचबारी घाटाच्या पायथ्याशी बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात तो मोटारसायकलवरून खाली पडला. अक्षयने मदतीसाठी आरडाओरडा केल्याने तेथून जाणाऱ्या नागरिकांनी धाव घेतली. लोकांची चाहूल लागताच बिबट्या पळून गेला.
हल्ल्यात अक्षयच्या शरीरावर नखांच्या खोल जखमा झाल्या. त्याला उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील लस आणि औषधोपचारासाठी त्याला तातडीने मालेगावला हलवण्यात आले. या प्रकारानंतर परिसरात पिंजरे लावण्याची मागणी होत आहे.
देवळा तालुक्यात बिबट्यांचा त्रास सातत्याने वाढत आहे. मागील आठवड्यात महालपाटणे येथील शेतकऱ्याची बैलजोडी बिबट्याने ठार केली. दोन दिवसांपूर्वी वाखारीच्या कापराई शिवारात रविंद्र मंगा भदाणे यांचा गोऱ्हाचा बिबट्याने फडशा पाडला. खर्डे येथे पाळीव कुत्र्याला ठार केले. आता एका तरुणावर थेट हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये बिबट्याबाबत दहशत पसरली आहे. शिवारात काम करणारे मजूर, शाळेत जाणारी मुले आणि शेतकरी सतत भीतीत जीवन जगत आहेत. परिसरात तातडीने पिंजरा ठेवून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांनी वनविभागाकडे केली आहे.