नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पावसाळ्यानंतर शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत झालेली झपाट्याने वाढ आता थंडीची चाहूल लागताच मंदावू लागली आहे. ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचे १३९ रुग्ण आढळल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची चिंता वाढली होती. मात्र, नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात डेंग्यूचे ३५ रुग्ण आढळल्याने या आजाराचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जानेवारी ते नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शहरातील एकूण डेंग्यूबाधितांची संख्या ३५६ वर पोहोचली आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच शहरात डेंग्यू, स्वाइन फ्लूसह कीटकजन्य आजारांनी डोके वर काढले होते.
पावसाळा संपल्यानंतर स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला. मात्र, डेंग्यूची साथ आटोक्यात येत नसल्याने आरोग्य विभागासमोर आव्हान निर्माण झाले होते. महापालिकेच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण, डेंग्यूचे हॉटस्पॉट शोधून त्यांचे निर्मूलन आणि औषध फवारणी अशा उपाययोजना राबविण्यात आल्या. मात्र, बांधकाम साहित्य, टाकाऊ वस्तू आणि अडगळीच्या ठिकाणी साचणाऱ्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती सुरूच असल्याने रुग्णसंख्येत वाढ होत होती.
जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत डेंग्यूचे ५६ रुग्ण आढळले होते. त्यानंतर ऑगस्टमध्ये ४५, सप्टेंबर महिन्यात ८१ रुग्णांची नोंद झाली. ऑक्टोबरमध्ये मात्र डेंग्यूने उच्चांक गाठत अवघ्या महिनाभरात १३९ जणांना बाधित केले. ऐन दिवाळीच्या काळात रुग्णसंख्येत झालेल्या या वाढीमुळे आरोग्य यंत्रणेची चिंता अधिकच वाढली होती.
मात्र, नोव्हेंबरमध्ये परिस्थितीत बदल दिसू लागला आहे. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २८ रुग्ण आढळले. दुसऱ्या आठवड्यात ही संख्या थेट सातवर आली. त्यामुळे पंधरवड्यातील रुग्णसंख्या ३५ इतकी आहे. थंडीचा प्रभाव वाढत असताना डेंग्यूचा प्रादुर्भावही कमी होत असल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.