

नाशिक : गंगापूर पाठोपाठ दारणा धरणातून 250 कोटींच्या थेट पाईपलाईन योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर Detailed Project Report) प्रकल्प सल्लागारामार्फत महापालिकेला सादर करण्यात आला असून, या अहवालाची तांत्रिक तपासणी केली जात आहे. केंद्र सरकारच्या अमृत-2 अभियानांतर्गत प्रकल्प खर्चाच्या 52.81 टक्के रक्कम अनुदान स्वरूपात प्राप्त होणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे नाशिक रोड विभागातील दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.
नाशिक शहराला गंगापूर, दारणा व मुकणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. दारणा नदीवरील चेहडी बंधाऱ्यातून नाशिकरोड परिसरात पुरवठा केला जातो. चेहेडी पंपीग स्टेशनच्या वरच्या बाजुला दारणा-वालदेवी नदीचा संगम आहे. वालदेवी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी सोडले जाते. हे प्रदूषित पाणी संगमाद्वारे दारणा नदीत मिसळते. तेच पाणी चेहडी पंपीग स्टेशनद्वारे उचलून नाशिकरोड विभागात पुरवठा केला जात असल्यामुळे दुषित पाणीपुरवठा होतो. त्यामुळे तूर्त चेहेडी पंपिंग स्टेशनवरून पाणी उचलणे बंद करण्यात आले आहे. परिणामी दारणा धरणात महापालिकेसाठी आरक्षित असलेले पाणी वाया जाते. त्याचबरोबर गंगापूर धरणातून अतिरीक्त पाणी उचलले जात असल्याने जलसंपदा विभागाकडे दुप्पट पाणीपट्टी भरावी लागते. त्यामुळे केंद्र सरकारच्या अमृत-2 अभियानातून दारणा धरणातून थेट जलवाहिनी योजना राबविण्याची मागणी आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी विधानसभेत केली होती. त्यानुसार महासभेने 250 कोटींच्या प्रस्तावाला महासभेत मंजुरी दिली होती.
या योजनेसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याकरीता सल्लागार कंपन्यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल महापालिकेला सादर केला आहे. या प्रकल्पाची छाननी केली जात असून, लवकरच शासनाला सादर केला जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रविंद्र धारणकर यांनी दिली.
दारणा धरण थेट पाईपलाईन योजनेसाठी महापालिकेला प्रकल्प खर्चाच्या एकूण 52.81 टक्के रक्कम अनुदान स्वरुपात मिळणार आहे. उर्वरित रक्कम महापालिकेला स्वनिधीतून खर्च करावी लागणार आहे. अनुदानाची रक्कम वगळता सव्वाशे कोटींचा आर्थिक भार महापालिकेवर पडणार आहे.
दारणा धरण थेट पाईपलाईन योजनेसाठी केंद्र शासनाच्या अमृत 2 अभियानातून निधीची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आराखड्यातही या योजनेचा समावेश करण्यात आला आहे. अमृत 2 अभियानातून निधी न मिळाल्यास सिंहस्थ निधीतून ही योजना साकारण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
नाशिकरोड विभागाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी दारणा धरणातून थेट पाईपलाईन योजना राबविण्याची मागणी आपण विधानसभेत केली होती. या योजनेचा केंद्राच्या अमृत २ योजनेत समावेश करण्यात आला असून या योजनेसाठी महापालिकेला अनुदान मिळणार आहे.
ॲड. राहुल ढिकले, आमदार, नाशिक पूर्व.