

नाशिक : यंदा अतिवृष्टीच्या आठवणी पुसट होत नाहीत, तोच अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली जात असल्याने, नदीकाठचे रहिवासी धास्तावले आहेत. शनिवारप्रमाणेच रविवारी (दि.२६) देखील अवकाळीने जिल्ह्याभर हजेरी लावल्याने, जिल्ह्यातील सहा धरणांमधून तब्बल १३ हजार ४०७ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पावसाची शक्यता बघता, विसर्गात वाढ केला जाण्याचा अंदाज जलसंपदा विभागाने वर्तविला आहे.
पूर्व, मध्य आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने, पाऊस २५ किमी प्रतितास वेगाने उत्तर ईशान्येकडे सरकल्याने, महाराष्ट्रातील बहुतांश भागात अवकाळीचा पाऊस कहर करीत आहे. हवामान विभागाने राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला असून, गेल्या दोन दिवसांपासून पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळत आहे. नाशिकला देखील २५ ते २७ ऑक्टोंबरपर्यंत हवामान विभागाने यलो अलर्ट दिला होता. त्यानुसार, शनिवारी (दि.२५) पावसाने शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात हजेरी लावली. विशेषत: धरण क्षेत्रात अवकाळीच्या जोरदार सरी बरसल्याने, धरणांमधून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविला जात आहे.
पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्वच धरणे काठोकाठ भरली आहे. आता अवकाळी बरसत असल्याने, धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. दिंडोरी तालुक्यातील कादवा नदीवरील पालखेड धरणातून रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत २,६२८ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात होता. याशिवाय ओझरखेडमधून १६०२, करंजवण १२००, पुणेगाव ५००, भोजापूर ३६ आणि वाघाड २५ असा एकुण नांदूर मध्यमेश्वर पाणलोट क्षेत्रातून १३ हजार ४०७ क्युसेक वेगाने विसर्ग केला जात होता.
रविवारी (दि.26) देखील अवकाळी या धरणक्षेत्रात हजेरी लावल्याने, विसर्गात आणखी वाढ केली जाण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तविली. याशिवाय नदीकाठच्या नागरिकांना सर्तकतेचा इशाराही दिला. यावेळी धरणातून केला जात असलेला विसर्ग बघता प्रशासकीय विभागांनी योग्य खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी दिल्या.
पालखेड - २६२८
करंजवन - १२००
ओझरखेड - १६०२
वाघाड - २५
पुणेगाव - ५००
भोजापूर - ३६
एकुण : १३ हजार ४०७ क्युसेक विसर्ग
जायकवाडीला पाणी, मराठवाड्यात पूर
यंदा संपूर्ण राज्यात अतिवृष्टी झाल्याने, मोठमोठे जलप्रकल्प काठोकाठ भरली आहेत. राज्यातील सर्वात मोठे धरण असलेले जायकवाडी देखील काठोकाठ भरले असून, पावसाळ्यात जायकवाडीतून केल्या गेलेल्या विसर्गामुळे मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. परिणामी लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. आता नांदूर मध्यमेश्वर पाणलोट क्षेत्रातून पुन्हा एकदा जायकवाडीला १३ हजार ४०७ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातून विसर्ग केल्यास मराठवाड्यात पुन्हा पुरस्थिती निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.