

सिडको ( नाशिक ) : अंबड लिंक रोड संजीवनगर भागात मागील भांडणाची कुरापत काढत टोळक्याने घरासमोर उभ्या असलेल्या कार तसेच दुचाकींची तोडफोड केली. तसेच रस्त्याने चाललेल्या दोघांना कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले. याप्रकरणी चुंचाळे पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहम्मद फैसल वाहिद शेख (२८) हे रविवारी (दि. 1) रात्री 10 च्या सुमारास संजीवनगर पाण्याच्या टाकीजवळ रस्त्याने पायी जात असताना चार दुचाकीवरून आलेल्या १० ते १२ टवाळखोरांनी चाकूने त्यांच्यावर वार केले. तसेच पायी चाललेल्या मोहम्मद अमीरूल शेख यांनादेखील त्यांनी धारदार हत्यारांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या टोळक्याने साई रुद्रा अपार्टमेंटच्या पार्किंगमधील कारच्या काचा फोडून नुकसान केले. याप्रकरणी चुंचाळे अंबड औद्योगिक वसाहत पोलिस चौकी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकाला अटक केली आहे.