

नाशिक : गोवर्धन शिवारात हवेत गोळीबार करून तलवारीचा धाक दाखवून पसार झालेल्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने शहरातून पकडले आहे. रोशन दिलीप जाधव (२४, रा. धर्माजी कॉलनी), तुषार विठ्ठल कापसे (२१), गौरव उर्फ बाळा जयराम माडे (२१) व अजय मनोज कापसे (२१, तिघे रा. गोवर्धन) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत.
गोवर्धन गावातील राजीवगांधी नगर परिसरात किशोर जाधव यांच्यावर जमावाने हल्ला करीत गावठी कट्ट्यातून गोळीबार केला होता. मात्र किशोर यांनी बचाव केल्याने हवेत गोळीबार झाला. त्यानंतर संशयितांनी तलवारीचा धाक दाखवून दहशत केली. याप्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी वासुदेव देसले यांच्या सुचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखा व नाशिक तालुका पोलिसांनी संयुक्तपणे तपास केला. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक उपनिरीक्षक नवनाथ सानप, तालुक्याचे पोलिस हवालदार शितलकुमार गायकवाड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने चौघांना पाथर्डी फाटा व अंबड परिसरातून पकडले. चौघांकडून गुन्ह्यात वापरलेली देशी पिस्तुल, १ तलवार, चाकू, एमएच ०१ बीजी ६५३५ क्रमांकाची कार असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
संशयितांविरोधात गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजू सुर्वे, सत्यजित आमले, सहायक निरीक्षक दिलीप खेडकर, संदेश पवार, अंमलदार नवनाथ सानप, नंदु वाघ, विनोद टिळे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.