Nashik Crime Update | मद्यतस्कर टोळीतील पाचवा संशयित गजाआड

८ ते १० कारमधून अवैधरीत्या मद्यवाहतूक
Nashik Crime Update
अवैध मद्यतस्करी प्रकरणात अटक केलेला पाचवा संशयित. समवेत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक.pudhari photo

नाशिक : चांदवड - मनमाड रस्त्यावर अवैध मद्यवाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शासकीय वाहनास धडक दिल्याने विभागाचा जवान ठार झाला. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचव्या मद्यतस्करास पकडले. भावेशकुमार मोहनभाई प्रजापती (४२, रा. ओलपाड, ता. जि. सुरत, राज्य गुजरात) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथून पकडले.

दि. ७ जुलै रोजी गुजरातमधील मद्यतस्करांनी ८ ते १० कारमधून अवैधरीत्या मद्यवाहतूक केली. त्यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभाग व ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी कारचालकाने विभागाच्या शासकीय वाहनास धडक देत कारमधील कर्मचाऱ्यांचा खून करण्याचा कट रचला. त्यानुसार त्याने वाहनास धडक दिल्यामुळे कारचालक कैलास कसबे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी तपास करीत संशयित देवीश पटेल, अश्पाक अली शेख, राहुल सहाणी, शोहेब अन्सारी या चार संशयितांना सुरुवातीला अटक केली. त्यानंतर तपासात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास या गुन्ह्यातील मद्यतस्कर नंदुरबार जिल्ह्यात लपल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक काही दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात संशयित प्रजापतीचा शोध घेत असताना, तो तळोदा येथे असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने सापळा रचून त्याला पकडले. संशयित प्रजापतीचा ताबा चांदवड पोलिसांना देण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे, उपनिरीक्षक नाना शिरोळे, हवालदार गणेश वराडे, मुकेश महिरे, धनंजय शिलावटे, संदीप झाल्टे, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले, भाऊसाहेब टिळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

प्रजापतीचा सहभाग

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने महामार्गावर सापळा रचत मद्यतस्करांचा महामार्गावर सिनेस्टाइल पाठलाग केला होता. त्यावेळी संशयित भावेशकुमार प्रजापती हा सोनेट कारधून अवैध मद्यसाठा घेऊन पळाला होता. त्याला पोलिसांनी नाकाबंदीच्या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांना हुलकावणी देत तो पसार झाला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news