

नाशिक : पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी जाणाऱ्या पिता- पुत्रावर चौघांनी मिळून प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी (दि. ८) मध्यरात्री १२.३० च्या सुमारास पाथर्डी फाटा येथील गुरुकृपा सुपर मार्केटजवळ घडली. यात नामदेव जाधव (३२, रा. पाथर्डी शिवार) हे जखमी झालेत.
अमित नामदेव जाधव (३२) यांच्या फिर्यादीनुसार, ते इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असून, त्यांना संशयित यश मोहन खिंवसरा, जुबेर जाकीर शेख, रिहान रफीक शहा, सूरज डोंगरे (चौघे रा. दामोदर चौक, पाथर्डी फाटा) यांनी अमितला शिवीगाळ केली होती. त्यामुळे अमित हे त्यांच्या वडिलांसह दुचाकीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात तक्रार देण्यासाठी जात होते. त्यावेळी चौघांनी अमित यांना अडवून पुन्हा शिवीगाळ करीत, 'तुमच्याकडे पाहून घेतो' अशी धमकी दिली. संशयित जुबेर शेखने त्याच्याकडील कोयता संशयित यशला दिला. यशने, 'तुझा गेमच करून टाकू' असे बोलून कोयत्याने अमितच्या वडिलांच्या डोक्यात वार केला. या हल्ल्यात अमितचे वडील गंभीर जखमी झाले. त्यानंतर संशयितांनी अमितलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच काेयत्याने वार करून डोक्यावर, कपाळावर दुखापत केली. अमित व त्यांचे वडील नामदेव जाधव यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी चौघांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या तपासात जखमी पिता पुत्र व यश एकमेकांचे शेजारी आहेत. घराच्या आवारात पाणी येत असल्याच्या कारणातून दोघांमध्ये वाद झाले होते. त्यानंतर यशने मित्रांना बोलवून घेत पिता- पुत्रावर हल्ला केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांनाही अटक केली आहे. न्यायालयाने चारही संशयितांना गुरुवार (दि. १२) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.