Nashik Crime Update | पहिले वाटलं बुक शेल्फ.. त्यामागे तर कॉल सेंटर... पर्दाफाश

नाशिकमधून काॅलसेंटर चालवित अमेरिकन नागरिकांना दोन लाख 40 हजार डॉलर्सना गंडा
नाशिक
नाशिक : सील केलेल्या मुद्देमालासह सायबर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी.Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : इंटरनेटद्वारे परदेशी नागरिकांना बनावट संदेश पाठवत, त्यांच्या संगणकात बिघाड करून दुरुस्तीच्या नावे दोनशे ते दोन हजार डॉलर्सची वसुली करणाऱ्या मुंबईतील हायटेक टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शहरातील अश्विननगरमधील एका बंगल्यात गुप्त दरवाजाच्या मागे कॉल सेंटर सुरू करून हा सर्व प्रकार सुरू होता. या टोळीने अमेरिकन नागरिकांकडून तब्बल दोन लाख ४० हजार डॉलर्सची वसुली केल्याचे समोर आले आहे.

Summary

२८ जानेवारी २०२५ रोजी सायबर पोलिस ठाण्यात गोपनीय लेखी तक्रार प्राप्त झाली होती. सायबर पोलिसांनी या तक्रारीनुसार गुरुवारी (दि.१३) अश्विननगर येथील प्लॉट नं. ६६, जानकी बंगला, भूमी अपार्टमेंट येथे पंचांसह धाड टाकली. यावेळी पोलिसांना अनेक धक्कादायक बाबी आढळून आल्या. या बंगल्यामध्ये दिशाभूल होईल, अशापद्धतीने दरवाजे असल्याने पोलिसही अवाक झाले होते. बारकाईने निरीक्षण केल्यानंतर एका दरवाजामागे असलेल्या खोलीत पाच तरुण आणि एक तरुणी १२ लॅपटॉप, सर्व्हर आणि १३ मोबाइलसह कॉल सेंटर चालवित असल्याचे आढळून आले.

व्हीआयआयपी कॉलवरून गिफ्ट व्हाउचर्स

पोलिसांनी त्यांचे कामकाज समजून घेतले असता, ते अमेरिकन नागरिकांना त्यांच्या संगणकांवर मायक्रोसॉफ्ट व ॲपल या नामांकित कंपनीकडून आलेले असे भासविणारे गंभीर स्वरूपाचे व्हायरल आक्रमण झाल्याचे नोटिफिकेशन पाठवित होते. तसेच तुमच्या संगणकात बिघाड झाल्याचे नोटिफिकेशनमध्ये बतावणी देत होते. त्यानंतर त्यांना +18448449736 या फोन क्रमाकांवर फोन करण्यास सांगितले जायचे. तसेच काॅल सेंटरमधून संगणकामधील बिघाड दूर करण्याकरिता कमीत कमी दोनशे ते दोन हजार डॉलर्सचे गिफ्ट व्हाउचर्स जवळच्या दुकानातून खरेदी करण्यास व त्या व्हाउचरवरील क्रमांक कळविण्यास व्हीआयआयपी कॉलवरून सांगत होते.

पोलिसांनी केला पंचनामा

अशा पद्धतीने या टोळक्याने २०२३ पासून ते आजपर्यंत सुमारे १०० ते १५० अमेरिकन नागरिकांना अंदाजे दोन लाख ४० हजार डॉलर्सना गंडा घातल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, सायबर पोलिसांनी सर्व लॅपटॉप, मोबाइल, सर्व्हर, ४७ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम आदी ताब्यात घेत पंचनामा केला आहे. तसेच सर्व संशयितांना ताब्यात घेऊन, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाच तरुण, एका तरुणीचा सहभाग

सायबर पोलिसांनी या प्रकरणी प्रणय अनिरुद्ध जैस्वाल (३०, रा. नालासोपारा, पूर्व पालघर), साहिल खोकोन शेख (२४, रा. माला पश्चिम, मुंबई), मुकेश गजानन पालांडे (४०, रा. नालासोपारा पूर्व, पालघर) आशिष प्रभाकर ससाणे (२८, रा. सांताक्रूझ पूर्व, मुंबई), चांद शिवदयाल बर्नवाल (२७, रा. मीरा रोड पूर्व, ठाणे), सादिक अहमद खान (२४, रा. मालवणी, मालाड पश्चिम, मुंबई) या पाच जणांसह समीक्षा शंकर सोनवले (२४, रा. खर्डीपाडा, ठाणे) या संशयित तरुणीला ताब्यात घेतले आहे. तर बिपीन साहू व रॉन ऊर्फ शादाब या दोघांचा पोलिस शोध सुरू आहे. हे दोघे गुन्ह्यातील फसवणूक झालेल्या रकमेचे व्यवस्थापन करीत होते. तसेच त्यांच्याकडे असलेले तांत्रिक पथक अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करीत होते.

बुक शेल्फ नव्हे दरवाजा

पोलिसांनी बंगल्यामध्ये पंचांसह धडक देत पाहणी केली असता, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. लक्षात येणार नाही, अशा प्रकारचा दरवाजा बनवून त्यामागे कॉल सेंटर उभारण्यात आले होते. पोलिस जेव्हा बंगल्यात शिरले तेव्हा बुक शेल्फ वाटेल, असा दरवाजा बनविल्याचे दिसून आले. पोलिसांनी बारकाईने निरीक्षण केल्यानंतर हा दरवाजा असल्याचे निष्पन्न झाले. त्यामागे कॉल सेंटर सुरू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news