Nashik Crime Update | दंगलीतील २२ संशयितांना न्यायालयीन कोठडी
नाशिक : जुने नाशिक येथे शुक्रवारी (दि. १६) झालेल्या दंगलप्रकरणात भद्रकाली पोलिसांनी २२ संशयितांना अटक केली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी पकडलेल्यांपैकी पाच ते सहा संशयित हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या दंगलीतील दाहकता समोर येत आहे.
बांगलादेश येथे हिंदुवर अत्याचार होत असल्याच्या कारणावरून सकल हिंदु समाजातर्फे नाशिक बंदची हाक देण्यात आली. त्यानुसार शुक्रवारी नाशिक बंदचे आवाहन करीत व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले जात होते. दुपारी जुने नाशिक परिसरात दोन गट समोरासमोर आल्याने बंदला हिंसक वळण लागले. दोन्ही गटाने एकमेकांवर तुफान दगडफेक केली. तर काही ठिकाणी प्राणघातक हल्ले करण्यात आले. याप्रकरणी भद्रकाली पाेलिस ठाण्यात सुमारे ३०० संशयितांविरोधात सहा गुन्हे दाखल असून पोलिसांनी २२ जणांना पकडले. तर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून सुमारे ६० संशयितांची ओळख पटवली. या दंंगलीत अल्पवयीन मुलांसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांचाही सहभाग समोर आला आहे. पकडलेल्यांपैकी काही संशयित सराईत गुन्हेगार आहेत. पकडलेल्या संशयितांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.