

नाशिक: शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हे शाखेकडून अचानक विशेष ऑपरेशन राबवत १०९ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली.
इंदिरानगरला सायंकाळी ७ ते १० या वेळेत विशेष मोहीम राबवून रस्त्यामध्ये दारू पिणारे, टवाळखोर, ट्रिपल शीट वाहन चालविणारे, मोकळे मैदानात दारू पिणारे अशा एकूण १०९ व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांना पोलिस ठाण्यात आणून त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्यावर ११२/११७ प्रमाणे कारवाई करण्यात आली. याप्रमाणे शहरातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत अचानक कॉबीग ऑपरेशन राबवून टवाळखोरांवर कारवाई करण्यात येणार आहे. शेखर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली.
नाशिकरोड : रेल्वे पोलिस ठाणे नाशिकरोड यांनी गस्तीदरम्यान तीन मोबाइल चोरट्यांना अटक करत चोरीस गेलेला मोबाइल, पाकीट आणि रोख रक्कम हस्तगत केली. दि. ३० सप्टेंबरच्या मध्यरात्री रेल्वेस्थानक परिसरातून संतोष चव्हाण (रा. सोलापूर), शेख खाज्या शेख अजीज (रा. परभणी) आणि राजेंद्र चव्हाण (रा. नाशिक) या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक मोबाइल व रोख रक्कम जप्त करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नरेंद्र खैरनार व त्यांच्या पथकाने केली.